Mumbai Tak Ground Report : गडचिरोलीच्या आदिवासी आश्रमशाळेत विषारी सर्पदंशामुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर ‘मुंबई तक’च्या रिएलिटी चेकमध्ये ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमधूनही गंभीर वास्तव समोर आलं आहे. मुरबाड तालुक्यातील मोरोशीच्या जंगल परिसरात असलेल्या शासकीय आदिवासी आश्रमशाळेत अस्वच्छतेचं चित्र दिसून आलं. विद्यार्थी ज्या खोल्यांमध्ये रात्री झोपतात, तिथल्या खिडक्यांच्या जाळ्या तुटलेल्या आहेत. मोठमोठे छिद्र पडलेल्या जाळ्यांवर कापड लावण्यात आलं आहे. पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ शेवाळ आणि घाणीचं साम्राज्य दिसून आलं. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी याच परिसरात विषारी साप आढळल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Personal Finance: एकाच पगारात घर, EMI, SIP आणि Emergency Fund कसं करायचं मॅनेज?
‘माईक घेऊ नका’, ‘चित्रीकरण करू नका’, मुख्याध्यापकांनी रोखलं
‘मुंबई तक’ने या आश्रमशाळेची पाहणी करताना विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही विद्यार्थ्यांनी रात्री झोपताना भीती वाटत असल्याचं सांगितलं. साप कोणता होता, असा प्रश्न विचारल्यानंतर विद्यार्थ्यांनी ‘मण्यार’ साप असल्याचं सांगितलं. आश्रमशाळेच्या परिसरात तुटलेल्या खिडक्यांच्या जाळ्या, कापड लावलेल्या जागा आणि अस्वच्छता दिसून आली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत ‘मुंबई तक’ने प्रभारी मुख्याध्यापक तानाजी पाटील यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी चित्रीकरण आणि बाईट घेण्यास आक्षेप घेतला. ‘माईक घेऊ नका’, ‘चित्रीकरण करू नका’, असं सांगत त्यांनी माध्यमांना थांबवण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा : महाजन... मलई आणि बरंच काही! 'त्या' घोटाळ्याची कागदपत्रं मुंबई Tak वर
नवीन इमारत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणार, मुख्याध्यापकाचं स्पष्टीकरण
प्रभारी मुख्याध्यापक तानाजी पाटील यांनी आश्रमशाळेची जुनी इमारत असून नवीन इमारत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणार असल्याचं सांगितलं. पावसाळा संपल्यानंतर नवीन इमारत होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र, ‘मुंबई तक’ने गडचिरोलीतील तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूचा संदर्भ देत, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचं सांगितलं. यावेळी देवराम लांडे यांनीही आश्रमशाळेची पाहणी केली. त्यांनी खिडक्यांच्या जाळ्यांना पडलेली छिद्रं, परिसरातील घाण आणि सापांच्या वावराचा मुद्दा उपस्थित केला. विद्यार्थ्यांनी सांगितलेल्या मण्यार सापाच्या घटनेबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली.
मोरोशीचा परिसर जंगल आणि सह्याद्रीच्या परिसरात असल्याने पावसाळ्यात सापांचा वावर होण्याची शक्यता असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. आश्रमशाळेच्या परिसरात सुमारे सात ते आठ एकर जागा असून त्यामध्ये काही जुन्या इमारती आहेत. या इमारतींच्या दुरुस्तीची आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची गरज असल्याचं ‘मुंबई तक’च्या पाहणीत समोर आलं. देवराम लांडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्याचं आणि आदिवासी मंत्री तसेच मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करण्याचं सांगितलं. गडचिरोलीतील घटनेनंतर राज्यातील आश्रमशाळांची तपासणी सुरू असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. मात्र, मोरोशीच्या आश्रमशाळेत माध्यमांना अडवण्याचा प्रयत्न झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
ADVERTISEMENT












