Maharashtra Weather : महाराष्ट्रात परतीचा पाऊस कधी सुरू होणार याची वाट पाहिली जात असतानाच, हवामान खात्याने (IMD) राज्यासाठी चिंतेचा इशारा दिला आहे. येत्या काही दिवसांत पावसाऐवजी तापमानात वाढ होऊन उष्णतेची लाट (हीट वेव्ह) येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उपग्रह (सॅटेलाइट) चित्रांनुसार उत्तर भारतासह महाराष्ट्रात ढगांचे आच्छादन कमी होऊन आकाश पूर्णपणे निरभ्र झाले आहे. त्यामुळे सूर्याची किरणे थेट जमिनीवर पडत असून तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ नोंदवली जात आहे. पावसाळा संपून हिवाळा सुरू होण्यादरम्यानच्या या 'ट्रांझिशन पिरियड'मुळे राज्यात 'ऑक्टोबर हिट'चा प्रभाव वाढला आहे.
ADVERTISEMENT
'या' ठिकाणी उष्णतेचा अलर्ट
हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर आणि आयएमडीच्या अंदाजानुसार, पुढील चार ते पाच दिवसांत कोकण किनारपट्टीवर हवामान अत्यंत उष्ण आणि दमट राहण्याचा अंदाज आहे. विशेषतः पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीच्या जिल्ह्यांसाठी उष्णतेचा 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. सागरी किनारपट्टीचा भाग असल्याने हवेतील बाष्प आणि आर्द्रतेचे (ह्युमिडिटी) प्रमाण अधिक आहे. परिणामी, तापमान 32 ते 35 अंश सेल्सिअस असले तरी प्रत्यक्षात 36 ते 37 अंश सेल्सिअस इतकी उष्णता नागरिकांना जाणवणार आहे.
हे ही वाचा : 15 वर्षांच्या पोरीने स्टेज गाजवलं, दिपकेंनी दुसऱ्यांदा माईक दिला, काय म्हणाली?
'या' भागात हलक्या सरींची शक्यता
पुढील दोन ते तीन दिवसांच्या जिल्हानिहाय अंदाजानुसार, रविवारी (4 ऑक्टोबर) ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत उष्णतेची लाट कायम राहील. तर सोमवारी (5 ऑक्टोबर) रायगड व रत्नागिरीमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे, सोमवारी सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या घाट माथ्यावर ढगांच्या गडगडाटासह (थंडरस्टॉर्म), सोसाट्याचा वारा आणि हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्यातील सुमारे 75 टक्के भागात आधीच दुष्काळसदृश परिस्थिती आणि पावसाची तूट असताना, किनारपट्टीच्या भागाला या वातावरणीय बदलाची पहिली झळ बसत आहे.
हे ही वाचा : पतीच्या हत्येसाठी पत्नीची जमीन विकण्याची तयारी, अनैतिक संबंधांसाठी संपवलं
हवामान खात्याचे नागरिकांना आवाहन
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाढत्या उकाड्यापासून आणि डिहायड्रेशनपासून बचाव करण्यासाठी पुरेसे पाणी पिणे आणि उन्हाचा थेट संपर्क टाळणे गरजेचे आहे. संध्याकाळच्या वेळी हवामानात काहीसा गारवा निर्माण होत असला, तरी सकाळ आणि दुपारच्या सत्रात तापमानाचा पारा वाढलेलाच राहील. परतीचा पाऊस सक्रिय होण्यापूर्वी नागरिकांना या ऑक्टोबर हिटच्या तीव्र झळांचा सामना करावा लागणार आहे.
ADVERTISEMENT












