मेहबूब जमादार, रायगड: रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या दिवेआगर येथे गुरुवारी (1 ऑक्टोबर) मोठी दुर्घटना घडली आहे. फिरण्यासाठी आलेल्या आठ जणांचा समुद्राच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील आळंदी येथून एका खासगी क्लासची सहल दिवेआगर येथे आली होती. यावेळी समुद्रकिनारी गेलेल्या आठ जणांचा पाण्यात बुडण्याचा प्रकार घडला. आठही जण बुडत असल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने समुद्राच्या दिशेने धाव घेतली.
स्थानिकांकडून तातडीने बचावकार्य
स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रयत्नांनंतर पाण्यात बुडालेल्या आठही जणांना समुद्राबाहेर काढले. त्यानंतर त्यांना किनाऱ्यावर आणण्यात आले. स्थानिकांनी त्यांना तातडीने सीपीआर देण्याचाही प्रयत्न केला. मात्र, दुर्दैवाने आठही जणांचा जीव वाचवण्यात यश आले नाही.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. दुर्घटनेनंतर बचावकार्य आणि पुढील आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सहलीदरम्यान घडली दुर्घटना
प्राथमिक माहितीनुसार, आळंदी येथील खासगी क्लासमधील विद्यार्थ्यांची सहल दिवेआगरला आली होती. सहलीदरम्यान समुद्रकिनारी गेलेल्या आठ जणांवर काळाने घाला घातला. समुद्रातील पाण्याची खोली आणि परिस्थितीचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक स्वरूपात सांगितले जात आहे.
दिवेआगर हे रायगडमधील लोकप्रिय पर्यटनस्थळ असून, सुट्टीच्या काळात येथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात. समुद्रकिनारी पर्यटकांनी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे आणि स्थानिक प्रशासनाने धोकादायक ठिकाणी दिलेल्या सूचनांकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक असल्याचे या घटनेने पुन्हा अधोरेखित केले आहे.
दरम्यान, या दुर्घटनेतील मृतांची ओळख, घटनेचे नेमके कारण आणि इतर तपशील प्रशासनाच्या अधिकृत माहितीनंतर स्पष्ट होणार आहेत.
रायगड पोलिसांची अधिकृत माहिती
रायगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे 5.30 वाजता आळंदी, पुणे येथील ‘विनर्स अकॅडमी फॉर 11th अँड 12th’ या अकॅडमीचे विद्यार्थी आणि शिक्षक पर्यटनासाठी दिवेआगर समुद्रकिनारी आले होते. या सहलीत 25 मुले, 17 मुली आणि 6 शिक्षक, असे एकूण 48 विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते.
दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे दिवेआगर येथील समुद्रकिनारी हे विद्यार्थी पर्यटनासाठी आले असताना, त्यापैकी 8 विद्यार्थी समुद्रात पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. स्थानिकांच्या मदतीने तसेच बचावकार्यातून या आठही विद्यार्थ्यांना समुद्रातून बाहेर काढण्यात आले. मात्र, या आठही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
- तन्मय दत्तात्रय वहीले
- सुमित भरत अहिरे
- प्रणव रामदास बनसोडे
- कैवल्य सतीश वासनकर
- राजवीर युवराज वहीले
- यश किरण वानखेडे
- सोहम तुकाराम भांडवलकर
- कौस्तुभ संदीप दौंड
रायगड पोलिसांच्या माहितीनुसार, मृत झालेले सर्व विद्यार्थी 16 वर्षांचे असून ते आळंदी, पुणे येथील रहिवासी आहेत. या घटनेप्रकरणी पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.
ADVERTISEMENT












