मुंबई: बोरीवली पश्चिम परिसरातून अन्नपदार्थांच्या स्वच्छतेबाबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बोरीवली स्टेशनजवळील एल.टी. रोडवरील राधाकृष्ण हॉटेलमध्ये सर्व्ह करण्यात आलेल्या मैसूर मसाला डोश्यात चक्क मृत उंदीर आढळल्याचा आरोप एका ग्राहकाने केला आहे. या घटनेनंतर हॉटेलमधील स्वच्छता आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, अमित त्रिवेदी हे आपल्या दोन भावांसह आणि मुलासोबत दक्षिण भारतीय पदार्थ खाण्यासाठी राधाकृष्ण हॉटेलमध्ये गेले होते. यावेळी त्यांनी मैसूर मसाला डोसा ऑर्डर केला.
डोश्याचे काही घास खाल्ल्यानंतर दिसला मृत उंदीर?
अमित त्रिवेदी यांच्या दाव्यानुसार, त्यांनी डोश्याचे काही घास खाल्ल्यानंतर त्यामध्ये एक छोटा मृत उंदीर दिसून आला. डोश्यात उंदीर आढळल्याचे लक्षात येताच त्यांना मोठा धक्का बसला. या प्रकारानंतर त्रिवेदी यांना उलट्या होऊ लागल्या. घटनेची माहिती त्यांनी बोरीवली पोलिसांना दिल्याचे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा>> गर्भवती नर्तिकेला मृत समजून जंगलात जिवंत जाळले, कलाकेंद्रातील वादाचा भयंकर शेवट!
हॉटेलच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह
या घटनेनंतर राधाकृष्ण हॉटेलमधील स्वच्छता, अन्नपदार्थांची हाताळणी आणि खाद्य सुरक्षेच्या नियमांचे पालन याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. हॉटेलमध्ये ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि स्वच्छता राखली जाते का, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.
हे ही वाचा>> पैशांचा हव्यास ते डॉक्टरला मारहाण; दिव्या शिंदेने जे कांड केले ते वाचाच, 10 गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल
विशेषतः डोसा तयार करण्याच्या प्रक्रियेत आणि स्वयंपाकघरात स्वच्छतेचे कोणते नियम पाळले जातात, तसेच अन्नपदार्थांमध्ये बाहेरील घटक जाण्याची शक्यता कशी निर्माण झाली, याबाबत तपासाची गरज व्यक्त केली जात आहे.
FDA आणि महापालिकेच्या कारवाईकडे लक्ष
या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर अन्न व औषध प्रशासन (FDA) किंवा मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून हॉटेलची तपासणी केली जाते का, याकडे आता लक्ष लागले आहे.
तपासणीनंतर अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेशी संबंधित नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित यंत्रणेकडून नियमानुसार कारवाई केली जाऊ शकते. मात्र, डोश्यात मृत उंदीर आढळल्याचा आरोप असून या दाव्याची अधिकृत तपासणी आणि पुष्टी होणे बाकी आहे. दरम्यान, या घटनेमुळे मुंबईतील हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये अन्नपदार्थांच्या स्वच्छतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
ADVERTISEMENT












