Maharashtra Weather : गेल्या काही दिवसांपासून चक्रीवादळाच्या चर्चा सुरू असतानाच थायलंड आणि बँकॉक परिसरात एका तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे (डीप डिप्रेशन) रूपांतर झाले असून, त्या भागात अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. या हवामान प्रणालीची हालचाल उत्तर-पूर्व बंगालच्या उपसागराच्या दिशेने होत असून, येत्या काळात त्याचा प्रभाव पूर्व भारतावर दिसण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी उत्तर प्रदेश आणि ओडिशा येथे झालेल्या डीप डिप्रेशनमुळे ओडिशामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती, जिथे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून बचावकार्य राबवावे लागले होते.
ADVERTISEMENT
हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज
सध्या महाराष्ट्रावर या चक्रीवादळ सदृश स्थितीचा थेट मोठा प्रभाव पडत नसला तरी, राज्यात दमट वारे आणि ढगाळ वातावरणामुळे काही भागात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे राज्य सरकारने अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली असून नेतेमंडळींचे पाहणी दौरे सुरू आहेत, तर दुसरीकडे हवामान विभागाने 28 ते 30 तारखेदरम्यान मध्य महाराष्ट्र आणि घाट परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
हे ही वाचा : मनोज जरांगे पाटील आक्रमक, आरोपांवर संतापले, काय म्हणाले?
'या' ठिकाणी येलो अलर्ट
पुढील 48 तासांच्या अंदाजानुसार, हवामान खात्याने 29 तारखेसाठी (मंगळवार) नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांतील घाट परिसरासाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे. या ठिकाणी वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि ढगाळ वातावरणासह पाऊस होऊ शकतो. तसेच मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि बीड या भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा नसला तरी विजा आणि वादळी वाऱ्यांच्या (थंडरस्टॉर्म) शक्यता दर्शवण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा : Personal Finance: मुलांच्या नावावर Investment करताना पालक करतात ‘या’ चुका!
'या' जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण
30 तारखेच्या (बुधवार) हवामान अंदाजानुसार सातारचा घाट परिसर, कोल्हापूरचा घाट परिसर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 'यलो अलर्ट' कायम ठेवण्यात आला आहे. उर्वरित पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि लगतच्या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस किंवा मुख्यत्वे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. थायलंडमधील डीप डिप्रेशनची पुढील दिशा आणि त्याची तीव्रता यावर परतीच्या पावसाचे व पुढील हवामानाचे गणित अवलंबून असणार आहे.
ADVERTISEMENT












