मनोज जरांगे पाटील आक्रमक, आरोपांवर संतापले, काय म्हणाले?
मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप होत आहेत. अमोल खुणे, अजय बारस्कर यांनीजरांगेंवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच जालन्यातील अंतरवाली सराटी गावातील काही महिलांनीही जरांगेंच्या हेतूवर शंका उपस्थित करणारे व्हिडिओ शेयर केले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मनोज जरांगे पाटील आक्रमक
आरोपांवर संतापले
थेट रोखठोक भूमिका
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप करत, आपल्याविरोधात खूप मोठे षडयंत्र रचले जात असल्याचा दावा केला आहे. आपल्याला एकाकी पाडणे, बदनाम करणे यासाठी विरोधकांकडून प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आपण कोणत्याही दबावाला किंवा त्रासाला बळी पडणार नसून मराठा समाजाच्या लेकराबाळांच्या कल्याणासाठी हा लढा शेवटपर्यंत सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, आगामी दसरा मेळावा परंपरेनुसार पार पडेल, परंतु दुष्काळी परिस्थितीमुळे तो साधेपणाने घेतला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
गुप्त बैठका घेऊन आंदोलकांना त्रास
आपल्या विरोधात होणाऱ्या त्रासावर भाष्य करताना जरांगे पाटील म्हणाले की, सध्या आपण शांत राहून सर्व धागेदोरे आणि पुरावे गोळा करत आहोत. सरकारमधील काही प्रमुख नेते आपल्याविरोधात गुप्त बैठका घेऊन आंदोलकांना त्रास देण्याचे आदेश दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारकडून मिळालेल्या तीन महिन्यांच्या वेळेत मराठ्यांच्या मागण्या पूर्ण करून मन जिंकण्याऐवजी, आपल्याला आणि सहकाऱ्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु योग्य वेळ आल्यावर सर्व छायाचित्रे आणि पुराव्यांसहित सरकारचे कटकारस्थान माध्यमांसमोर उघड करू, असा इशारा त्यांनी दिला.
हे ही वाचा : Personal Finance: मुलांच्या नावावर Investment करताना पालक करतात ‘या’ चुका!
गावकऱ्यांची इच्छा असल्यास...
अंतरवली सराटी येथील स्थानिक महिलांच्या विरोधावर बोलताना त्यांनी अत्यंत सामंजस्याची भूमिका घेतली. गावकरी किंवा भगिनी गैरसमजातून काही बोलल्या तरी आपण त्यांच्याविरोधात एक शब्दही बोलणार नाही, कारण या गावाने मराठा आंदोलनासाठी रक्त सांडले आहे आणि मोठे योगदान दिले आहे, असे ते म्हणाले. गावकऱ्यांची इच्छा असल्यास त्यांनी स्वतः व्यासपीठ उभारावे, आपण तेथेही आंदोलन करण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समाजाने लहान-सहान गोष्टींना पोटात घालून एकजूट कायम ठेवावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
हे ही वाचा : भाजप माजी आमदाराला बलात्कार प्रकरणात कोर्टाचा मोठा दणका, पाहा काय घडलं
'षडयंत्र मराठा समाज उधळून लावेल'
आंदोलकांमागे चौकशीचा ससेमिरा आणि वसुलीच्या नोटिसा लावून सरकार सूडबुद्धीने वागत असल्याचा घणाघात जरांगे पाटील यांनी केला. अशा त्रासाला घाबरून मराठा समाज कधीही शरण जाणार नाही किंवा कोणाचे गुलाम होणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपण पक्षासाठी नव्हे तर समाजाच्या भविष्यासाठी लढत आहोत, हे मराठा समाजाला चांगलेच माहीत आहे. त्यामुळे हे षडयंत्र मराठा समाजच उधळून लावेल आणि सरकारकडून आरक्षण मिळवूनच शांत बसेल, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
