UICCL Recruitment : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (UIIC) मध्ये एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (स्केल-1) पदांच्या 225 जागांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. यामध्ये एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (जनरलिस्ट) पदाच्या 200 जागा आणि एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (हिंदी ऑफिसर) पदाच्या 25 जागांचा समावेश आहे. पात्र आणि इच्छुकांसाठी ही संपूर्ण भारतात नोकरी करण्याची एक मोठी संधी उपलब्ध झाली असून, निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा सुमारे 1,10,000 रुपये (महानगरीय शहरांमध्ये) आकर्षक ग्रॉस वेतन मिळणार आहे. याशिवाय वैद्यकीय सुविधा, ग्रॅच्युइटी आणि राष्ट्रीय पेन्शन योजना यांसारखे इतर अनेक फायदे लागू राहतील.
ADVERTISEMENT
शैक्षणिक पात्रता काय?
या भरती प्रक्रियेसाठी शैक्षणिक पात्रतेचा निकष निश्चित करण्यात आला आहे. जनरलिस्टसाठी अर्जदार कोणत्याही शाखेतील 60% गुणांसह पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती, जमाती व दिव्यांग उमेदवारांसाठी 55% गुण आवश्यक आहेत; तर हिंदी ऑफिसरसाठी इंग्रजी विषयासह हिंदी विषयातील पदव्युत्तर पदवी 60% गुणांसह उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. उमेदवारांचे वय 30 जून 2026 रोजी 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे. शासकीय नियमांनुसार अनुसूचित जाती व जमातीतील उमेदवारांना 5 वर्षे, तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना वयात 3 वर्षे सूट देण्यात आली आहे.
हे ही वाचा : Antilia Bomb Case: मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी सचिन वाझे तुरुंगातून येणार बाहेर, कोर्टाकडून मोठा दिलासा
'असा' करा अर्ज
या पदांसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 ऑक्टोबर 2026 आहे. परीक्षा शुल्काचा विचार केल्यास सर्वसाधारण, इतर मागासवर्गीय (OBC) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील (EWS) उमेदवारांसाठी 1,000 रुपये शुल्क आहे; तर अनुसूचित जाती, जमाती, माजी सैनिक आणि सर्व महिला उमेदवारांसाठी 250 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. सर्व उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून (uiic.co.in) मुदतीपूर्वी अर्ज पूर्ण करणे आवश्यक आहे.
हे ही वाचा : जळगाव : मैत्रिणीने गोड बोलून स्वच्छतागृहात नेलं अन् दोघांकडून सामूहिक बलात्कार
परीक्षा कधी होणार?
उमेदवारांची निवड पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या माध्यमातून केली जाईल. नियोजित वेळापत्रकानुसार पूर्व परीक्षा (Tier I) 22 ऑक्टोबर 2026 रोजी आयोजित केली जाणार असून, यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची मुख्य परीक्षा (Tier II) 30 नोव्हेंबर 2026 रोजी घेतली जाईल. उत्तम वेतनश्रेणी आणि सुरक्षित सरकारी करिअर घडवू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा.
ADVERTISEMENT












