Antilia Bomb Case: मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी सचिन वाझे तुरुंगातून येणार बाहेर, कोर्टाकडून मोठा दिलासा
अँटिलिया बॉम्ब धमकी आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला मुंबईतील विशेष NIA न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: 2021 मधील अँटिलिया बॉम्ब धमकी प्रकरण आणि उद्योगपती मनसुख हिरेन हत्या प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईतील विशेष NIA न्यायालयाने सचिन वाझेला या प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. मात्र, न्यायालयाचा सविस्तर आदेश अद्याप उपलब्ध झालेला नसल्याने जामीन देण्यामागची नेमकी कारणे आणि अटी स्पष्ट झालेल्या नाहीत.
अँटिलिया प्रकरणामुळे 2021 मध्ये मुंबईसह संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळून आली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचाही संबंध या प्रकरणाशी जोडला गेला आणि तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपवण्यात आला.
सचिन वाझे हा या प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक आहे. तो दीर्घकाळापासून न्यायालयीन कोठडीत होता. आता विशेष NIA न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केल्याने तो आता लवकरच तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे.
1 ऑगस्टला आरोप निश्चित
या प्रकरणात विशेष NIA न्यायालयाने 1 ऑगस्ट रोजी आरोपींविरोधात आरोप निश्चित केले होते. त्यानुसार आरोपींवर हत्या, जबरदस्तीने वसुली, पुरावे नष्ट करणे आणि गुन्हेगारी कट यांसारख्या गंभीर आरोपांखाली खटला चालणार आहे.
