ताबूक (सौदी अरब): दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात बुधवारी घडलेल्या भीषण घटनेनंतर आता काही व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओमध्ये भारतीय पायलट स्मित मछार हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेला दिसत आहेत. त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर जखमा स्पष्ट दिसत आहेत, पण त्यांचा आत्मविश्वास कायम आहे.
ADVERTISEMENT
व्हिडिओमध्ये कॅप्टन स्मित अत्यंत गंभीर अवस्थेत दिसत आहे. कॉकपिटमध्ये आणि आजूबाजूला रक्त दिसत आहे. आरोपीचे हात बांधलेले असून प्रवाशांनी त्याला पकडले आहे. हल्ल्यात गंभीर जखमी होऊनही, स्मितने धैर्य दाखवले आणि विमानातील प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले. FZ1073 विमान नंतर सौदी अरेबियाकडे वळवण्यात आले आणि तिथे ते सुरक्षितपणे उतरवलं गेलं.
व्हिडिओमध्ये कॅप्टन स्मित असे म्हणताना दिसतोय की, "माझं डोकं दुखतंय. ते ठणकतंय. मला उशी द्या. मला झोपायचं नाहीये. माझा हात दुखतोय." एक प्रवासी असे म्हणताना ऐकू येतो, "त्यांनी (आरोपींनी) आमचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला. आम्ही पायलटचं रक्षण करत आहोत. आरोपी को-पायलटने पायलटला ठार मारण्याचा प्रयत्न केला."
सुरक्षित लँडिंग व्हावी हीच स्मितची होती मुख्य चिंता
वृत्तानुसार, गंभीर जखमी झाल्यानंतरही, कॅप्टन स्मित यांची मुख्य चिंता स्वतःच्या जखमा नसून, विमानाची आणि त्यातील प्रवाशांची सुरक्षितता होती. त्यांना शुद्धीवर राहायचे होते, जेणेकरून गरज पडल्यास ते विमान उतरवण्यास मदत करू शकतील. या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून, विमानाने आपत्कालीन स्थितीचा संकेत दिला आणि विमानातील ऑफ-ड्युटी पायलट्सनी सौदी अरेबियातील तबूक येथे आपत्कालीन लँडिंग केले. विमान सुरक्षितपणे उतरले आणि हल्ला करणाऱ्या को-पायलटला सौदी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.
आता समोर आलेला व्हिडिओ सौदी अरेबियातील तबूक येथे विमान उतरल्याच्या क्षणाचा आहे. या व्हिडिओमध्ये कॅप्टन स्मिथ रक्तबंबाळ अवस्थेत पण पूर्णपणे शुद्धीवर असल्याचे दिसत आहेत. त्यांच्यासोबत असलेले इस्रायली नागरिक, कॅप्टन स्मित कोणत्याही धोक्यात नाहीत याची खात्री करण्यासाठी सौदी पोलिसांना बोलावण्याची वारंवार मागणी करत दिसत आहे. कॅप्टन स्मित धैर्याने पोलीस आणि वैद्यकीय मदतीची वाट पाहत आहे.
हा व्हिडिओ त्या क्षणाचा आहे, जेव्हा त्याला स्ट्रेचरवर विमानातून उतरवून तबूक येथील रुग्णालयात नेण्यात आले. पण त्याआधी, ओमानच्या सह-वैमानिकाने त्यांच्यावर अनेक वेळा हल्ला केल्याचे म्हणत असल्याचं ऐकू येतंय. इतकेच नाही, तर तो म्हणतोय की तो चालू शकतो पण त्याचे हात हलवू शकत नाही.
विमान 30 हजार फूट उंचीवर असताना झाला हल्ला
फ्लायदुबईचे FZ1073 विमान बुधवारी सकाळी दुबईहून तेल अवीवसाठी निघाले. विमान अंदाजे 30,000 ते 34,000 फूट उंचीवर उडत होते. सह-वैमानिकाने कॉकपिटमध्ये कॅप्टन स्मित यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यानंतर, विमानाची उंची अचानक वेगाने कमी होऊ लागली आणि काही सेकंदातच वेगाने हजारो फूट खाली येऊ लागलं. यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली.
जखमी असूनही, कॅप्टन स्मितने कॉकपिटचा दरवाजा उघडण्यात यश मिळवलं. त्यानंतर काही प्रवाशांनी कॉकपिटमध्ये प्रवेश केला आणि हल्लेखोरावर मात केली. प्रवाशांनी सांगितले की, आरोपी विमानाच्या प्रणालीमध्ये फेरफार करत होता. जर कॅप्टन स्मितने वेळीच दरवाजा उघडला नसता, तर प्रवाशांना आत जाण्याची संधी मिळाली नसती आणि विमान कोसळले असते.
पंतप्रधान मोदी आणि नेतान्याहू यांनी केली प्रशंसा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही कॅप्टन स्मितच्या शौर्याची प्रशंसा केली आहे. दरम्यान, हल्लेखोरावर मात करण्यास आणि प्रवाशांचे प्राण वाचवण्यास मदत करणाऱ्या चार नागरिकांचा सन्मान करण्याचा निर्णय इस्रायलने घेतला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या मते, आरोपी सह-वैमानिक विमान पाडण्याच्या उद्देशाने कॉकपिटमध्ये हल्ला करत होता.
इस्रायली अधिकाऱ्यांच्या मते, प्राथमिक मूल्यांकनानुसार त्याचा हेतू विमान पाडण्याचा असू शकतो. हल्ल्यामागील खरा हेतू अद्याप तपासाधीन असला तरी, इस्रायलच्या पंतप्रधानांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, 9/11 सारखा हल्ला अटळ होता, परंतु भारतीय वैमानिक स्मित मछारच्या असामान्य शौर्याने तो टाळला.
या घटनेसंदर्भात, भारतातील इस्रायलचे राजदूत रुवेन अझर यांनी 'आज तक'ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत सांगितले की, राष्ट्रपतींपासून ते पंतप्रधानांपर्यंत आणि सामान्य इस्रायली नागरिकांपर्यंत सर्वजण कॅप्टन स्मितच्या शौर्याबद्दल बोलत आहेत. ते म्हणाले की, कॅप्टन स्मितने विमानातील सुमारे 180 लोकांचे प्राण वाचवले.
ADVERTISEMENT












