15 वर्षांच्या पोरीने स्टेज गाजवलं, दिपकेंनी दुसऱ्यांदा माईक दिला, काय म्हणाली?

मुंबई तक

मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये CJPच्या आंदोलनादरम्यान एका 15 वर्षांच्या मुलीने मंचावर येत भाषण केलं. तिच्या भाषणानंतर CJPचे अभिजीत दिपके यांनी तिला पुन्हा माईक दिला. हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

ADVERTISEMENT

CJP Protest Mumbai
CJP Protest Mumbai
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

15 वर्षांच्या पोरीने स्टेज गाजवलं

point

दिपकेंनी दुसऱ्यांदा माईक दिला

point

काय म्हणाली?

CJP Protest Mumbai : मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर काल (2 ऑक्टोबर) झालेल्या सीजेपीच्या आंदोलनादरम्यान एका 15 वर्षांच्या मुलीच्या भाषणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आंदोलनाच्या मंचावर आलेल्या या अनुष्का नावाच्या 15 वर्षीय मुलीने अत्यंत आक्रमक आणि रोखठोक शैलीत आपले विचार मांडले. तिच्या या भाषणानंतर CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी तिला माईक देऊन तिचे मत मांडण्याची संधी दिली. या संपूर्ण घटनेचा आणि तरुणीच्या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून उपस्थितांकडून त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

'स्वत:लाच पीडित म्हणून सादर करतात'

मंचावरून बोलताना अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानांवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, पंतप्रधान स्वतःला नेहमीच पीडित (विक्टिम) म्हणून सादर करतात, परंतु देशात महिला सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या मुली खऱ्या पीडित आहेत. एका 15 वर्षांच्या मुलीच्या वक्तव्यावरून तिच्यामागे संपूर्ण पोलीस यंत्रणा लावल्याचा आरोप करत त्यांनी सरकारच्या या भूमिकेवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. त्यानंतर त्यांनी अनुष्का या 15 वर्षीय मुलीला मंचावर आमंत्रित करून उपस्थितांशी संवाद साधण्यास सांगितले.

हे ही वाचा : '...तर तुम्ही आजही चहाचा गाडाच लावला असता', दिपकेंची मुंबईतून PM मोदींवर जहरी टीका

15 वर्षीय अनुष्का काय म्हणाली?

माईक हातात घेत अनुष्काने आपल्या भाषणात सरकार आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. "अचानक स्वयंपाकघरातील लाईट लावल्यानंतर कॉकरोच जसे सैरावैरा पळतात, तशीच सध्याच्या सरकारची अवस्था झाली आहे," अशी घणाघाती टीका तिने केली. देशभरात एकापाठोपाठ एक निघणाऱ्या आंदोलनांच्या लाटेमुळे सरकारला नेमके काय करावे हे सुचत नाहीये, असा टोलाही तिने लगावला. आंदोलकांना पोलीस काय करणार? फार तर डिटेन करतील किंवा मारतील, पण यावेळी जनता पूर्ण तयारीने उतरली आहे, असा विश्वास तिने व्यक्त केला.

हे ही वाचा : CJP Protest: 'ग्यानू काका राजीनामा द्या.. राजीनामा द्या...', शिवाजी पार्कवर जोरदार घोषणाबाजी

'तीन महिने जेलमध्ये टाका'

भाषणाच्या शेवटी अभिजीत दिपके यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागले. आंदोलकांना तीन दिवस जेलमध्ये टाकण्याच्या धमकीला उत्तर देताना ते म्हणाले की, महाराष्ट्राला जिजाऊ, सावित्रीबाई फुले, शाहू, फुले आणि आंबेडकरांचा वैचारिक वारसा लाभला आहे. अशा धमक्यांना महाराष्ट्रातील जनता अजिबात घाबरणार नाही. तीन दिवस काय, हिंमत असेल तर तीन महिने जेलमध्ये टाकून दाखवावे, असे थेट आव्हानच त्यांनी दिले.