'...तर तुम्ही आजही चहाचा गाडाच लावला असता', दिपकेंची मुंबईतून PM मोदींवर जहरी टीका
शिवाजी पार्कवरील आंदोलनात CJP संयोजक अभिजीत दीपके यांनी महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांचं कौतुक करत केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीतील पोलीस कारवाईवर जोरदार टीका केली.
ADVERTISEMENT

मुंबई: शिवाजी पार्क येथे आयोजित आंदोलनात कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) संयोजक अभिजीत दीपके यांनी महाराष्ट्र पोलिसांचं कौतुक करताना केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी दीपके यांनी मुंबई पोलिसांबाबत बोलताना त्यांची शैलीतून स्तुती केली, तर दिल्लीतील पोलीस कारवाईवरही गंभीर आरोप केले. याशिवाय त्यांनी गांधी जयंतीच्या निमित्ताने महात्मा गांधींच्या विचारांचा उल्लेख करत केंद्र सरकारवर निशाणा साधला.
दीपके यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र पोलिसांसाठी जोरदार टाळ्या वाजवण्याचं आवाहन केलं. “महाराष्ट्र पोलीस देशातील सर्वोत्तम पोलीस आहेत. मुंबई पोलिसांचं जगभरात उगाच नाव घेतलं जात नाही. मुंबई पोलीस जबरदस्त आहेत,” असं ते म्हणाले.
यावेळी त्यांनी मुंबई पोलिसांना ‘OG Pookie’ असं म्हणत मिश्कील शैलीत भाष्य केलं. पोलिसांना आंदोलकांना ताब्यात घेण्याचे आदेश वरून आले होते, असा दावा करत दीपके म्हणाले की, “मुंबई पोलिसांनी मला उचललं नाही, तर चहा पाजला आणि ‘जा सर’ असं सांगितलं.” तसेच मुंबई पोलीस आपण करत असलेलं काम योग्य असल्याचं सांगत होते, असा दावाही त्यांनी केला.
दिल्लीतील पोलिसांवरही टीका
यानंतर दीपके यांनी दिल्लीतील पोलीस अधिकारी सचिन शर्मा यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी सचिन शर्मा यांच्यावर टीका करत त्यांची तुलना जनरल डायरशी केली. छोट्या मुलींना मारहाण केल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच सचिन शर्मा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला.
