Barshi News : जिल्हा परिषद प्रशासनाने ओडिशामध्ये हरवलेल्या एका आजीला सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवत मानवतेचा सुंदर आदर्श घालून दिला. ही संपूर्ण घटना संवेदनशील संवाद, योग्य समन्वय आणि निष्ठेने केलेल्या प्रयत्नांची हृदयस्पर्शी गोष्ट ठरली. 73 वर्षीय विजयाबाई रघुनाथ जाधव यांना ओडिशातून सांगली येथे आणल्यानंतर त्यांची बार्शीतील नातेवाइकांशी भेट घडवून आणण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेत सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी सर्व आवश्यक जबाबदाऱ्या काटेकोरपणे सांभाळल्या. ओडिशात हरवलेल्या बार्शीच्या आजीबाई झारसगुडाचे जिल्हाधिकारी कुणाल चव्हाण आणि सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्यातील संवेदनशील समन्वयामुळे स्वगृही परतल्या.
ADVERTISEMENT
ओडीशातून महाराष्ट्रात पोहोचण्याचा मार्ग कसा सापडला?
घरापासून, आपल्या माणसांपासून आणि परिचित जगापासून दूर… अनोळखी ठिकाणी आजीचा हा एकाकी अनपेक्षित प्रवास ओडिशाहून व्हाया सांगली ते परत बार्शीपर्यंत प्रशासनाच्या सुंदर सहकार्याने परिपूर्ण झाला आहे. तर ही कहाणी आहे 73 वर्षांच्या विजयाबाई रघुनाथ जाधव यांची. विजयाबाई मूळच्या बार्शीच्या. एखाद्या चित्रपटात शोभेल असे वळण आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांच्या जीवनात आले. कुर्डुवाडी येथून चुकीच्या रेल्वेने ओडिशा येथे पोहोचल्या. हरवलेल्या या आजी ओडिशा राज्यातील झारसुगुडा जिल्ह्यातील झारसगुडा येथे गेल्या. तेथे एका एनजीओने त्यांना सांभाळले. त्या संस्थेला भेट देण्यासाठी झारसगुडाचे जिल्हाधिकारी कुणाल चव्हाण गेले होते. जे मूळचे महाराष्ट्रातील परभणीचे आहेत. त्यांच्याशी त्या मराठीतून बोलल्या आणि मग आजीचा आपल्या लोकांकडे परत येण्याचा मार्ग अधोरेखित झाला.
हेही वाचा : तरुणाने महिला पोलीस कॉन्स्टेबलला पाठवले अश्लील फोटो, आरोपीवर गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
दोन जिल्हाधिकारी मित्रांनी आजीचा प्रवास केला सुखकर
डोळ्यांमध्ये आपल्या नातलगांकडे जाण्याची आस लावून बसलेल्या या आजींचा मानवतेवरचा विश्वास प्रशासनाच्या संवेदनशीलतेने आज दृढ झाला. सांगली जिल्हा परिषदेचे सीईओ विशाल नरवाडे आणि झारसगुडाचे जिल्हाधिकारी कुणाल चव्हाण हे बॅचमेंट. त्या दोघांनी मिळून आजींशी व्हिडिओ कॉल द्वारे संवाद साधला. आणि आजीचा तो संवाद व्हायरल केला आणि आजीची मुलगी असलेल्या वदना वाघमारे या मुलीपर्यंत तो व्हिडिओ पोहोचला. त्यानंतर आजीबाईंच्या मुलीने विशाल नरवाडेंना कॉल केला. गेली दोन वर्षे त्या आपल्या आईला शोधत असल्याचे सांगितलं. विशाल नरवाडेंनी त्या एनजीओशी ( विकाश संस्था) पुन्हा संपर्क साधला. आजींचे आणि संस्थेचे एक स्वयंसेवक रश्मी रंजन यांचे तिकीट पाठवले आणि आजींचा आपल्या घरी बार्शीला येण्याचा प्रवास सुरू झाला. यासाठी त्या वारंवार कृतज्ञता व्यक्त करत होत्या. आज त्या सांगलीत पोहोचल्या. लवकरच त्यांना बार्शीला सोडण्यात येणार असल्याची माहिती सांगली जिल्हा परिषदेचे सीईओ विशाल नरवडे यांनी दिली आहे.
आजींचा ओडिशापासून सांगलीपर्यंतचा हा प्रवास म्हणजे फक्त अंतराचा नव्हे तर ते माणुसकीचे आणि सहकार्याचे उदाहरण आहे . म्हणूनच सांगलीत परतल्यानंतर विजयाबाई प्रशासनाला वारंवार आशीर्वाद देत होत्या. विजयाबाई जाधव यांची ही कहाणी केवळ एका हरवलेल्या माऊलीची नाही; तर ती मानवतेवरचा विश्वास दृढ करणारी, संवेदनशील प्रशासनाचा सुंदर दाखला देणारी आणि जागतिक मानवी हक्क दिनाला अर्थपूर्णता देणारी आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
मुंबई : 13 वर्षे महिलेसोबत शरीरसंबंध, लग्नाचे आमिष दाखवून 3 वेळा गर्भपात, मॅनेजरनं कांड करूनही...
ADVERTISEMENT











