Beed Crime : रोहिदास हातागळे/बीड : आष्टी तालुक्यातील सांगवी (पाटण) येथे एका 21 वर्षीय तरुणाने आई-वडिलांच्या ओरडण्याचा राग मनात धरून गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. विराज हरिदास भगत असे मृत तरुणाचे नाव असून, घरगुती कामात मदत करत नसल्याच्या कारणावरून पालकांनी त्याला रागावल्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. आई-वडिलांच्या साध्या बोलण्याचा विराजने इतका धसका घेतला की त्याने स्वतःचे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : तीन मुली झाल्या, दुसरं लग्न करण्याची परवानगी दे, सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या
मिळालेल्या माहितीनुसार, विराज हा गेल्या काही दिवसांपासून घरच्या कामांकडे दुर्लक्ष करत होता. यामुळे त्याचे आई-वडील त्याच्यावर काहीसे नाराज होते. मंगळवारी सकाळी पालकांनी त्याला 'तू घरच्या कामात मदत का करत नाहीस?' असे विचारत थोडे रागावले. मात्र, सर्वांसमोर रागावलेले विराजच्या जिव्हारी लागले. यातून आलेल्या नैराश्यातून त्याने सकाळी कोणालाही काही न सांगता घराबाहेर पाऊल टाकले. तो थेट गावातील काळशेत शिवारातील आपल्या मालकीच्या शेतात गेला आणि तेथे एका आंब्याच्या झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.
विराज बराच वेळ घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. अखेर त्याची बहीण त्याला शोधण्यासाठी शेतात गेली असता, तिला विराज झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. हा धक्कादायक प्रकार पाहताच तिने आरडाओरडा केला, ज्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने तिथे धाव घेतली. कुटुंबीयांनी त्याला तातडीने खाली उतरवून कडा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. विराज हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता, त्यामुळे त्याच्या जाण्याने भगत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











