तीन मुली झाल्या, दुसरं लग्न करण्याची परवानगी दे, सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या
Beed Crime News : भक्तीला तीन मुली झाल्या होत्या, याच कारणावरून तिचा गेल्या अडीच वर्षांपासून शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. नवऱ्याला दुसरे लग्न करण्यासाठी संमती द्यावी, यासाठी तिला वारंवार मारहाण करून एका बाँड पेपरवर लिहून देण्याची सक्ती केली जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तीन मुली झाल्या, दुसरं लग्न करण्याची परवानगी दे
सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या
Beed Crime News, रोहिदास हातागळे/बीड : बीड तालुक्यातील म्हाळसापूर येथे एका 24 वर्षीय विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भक्ती अमोल कोरडे असे मृत विवाहितेचे नाव असून, याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्या केलेल्या भक्तीला तीन मुली झाल्या होत्या, याच कारणावरून तिचा गेल्या अडीच वर्षांपासून शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. नवऱ्याला दुसरे लग्न करण्यासाठी संमती द्यावी, यासाठी तिला वारंवार मारहाण करून एका बाँड पेपरवर लिहून देण्याची सक्ती केली जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
सासरच्या तिघांविरोधात गुन्हा दाखल
सासरच्या या छळाला कंटाळून भक्तीने 2 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी राहत्या घरी विष प्राशन केले होते. तिला तातडीने बीड येथील जिल्हा रुग्णालयात आणि त्यानंतर खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने तिला पुन्हा सरकारी दवाखान्यात हलवण्यात आले, जिथे उपचारादरम्यान 6 मार्च 2026 रोजी तिची प्राणज्योत मालवली. भक्तीची आई गंगुबाई प्रभू ठोकळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमोल अर्जुन कोरडे, अर्जुन साधू कोरडे आणि आशाबाई अर्जुन कोरडे यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 108, 115(2), 3(5) आणि 85 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अर्जुन घोलवाल करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या










