ठाणे : बिल्डरच्या हत्येची सुपारी दिल्याचा भाजप आमदारावर आरोप, गँगस्टर इजाज लाकडावालाच्या पत्रामुळे खळबळ..

गँगस्टर इजाज लाकडावाला याने ठाणे पोलीस आयुक्तांना पाठवलेल्या एका पत्रामुळे ठाणे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या पत्रात अंबरनाथमधील बिल्डर विश्वनाथ पनवेलकर यांच्या हत्येची सुपारी देण्याचा प्रयत्न भाजपा आमदार किसन कथोरे यांनी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

Gangster Lakdawala letter to Thane Police Commissioner

Gangster Lakdawala letter to Thane Police Commissioner

मिथिलेश गुप्ता

11 Apr 2026 (अपडेटेड: 11 Apr 2026, 05:24 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

गँगस्टर इजाज लाकडावालाच्या पत्रामुळे ठाण्यात खळबळ

point

बिल्डरच्या हत्येची सुपारी देण्याचा आमदार किसन कथोरे यांच्यावर आरोप

point

बिल्डर विश्वनाथ पनवेलकर यांचा पोलिसांवर सहकार्य न केल्याचा आरोप

Gangster Lakdawala letter to Thane Police Commissioner : अर्थर रोड कारागृहात बंद असलेल्या गँगस्टर इजाज लाकडावाला याने पोस्टाद्वारे ठाणे पोलीस आयुक्तांना पाठवलेल्या एका पत्रामुळे ठाणे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या पत्रात अंबरनाथमधील बिल्डर विश्वनाथ पनवेलकर यांच्या हत्येची सुपारी देण्याचा प्रयत्न भाजपा आमदार किसन कथोरे यांनी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

पत्रात काय लिहिलंय?

मिळालेल्या माहितीनुसार, 21 एप्रिल 2025 रोजी अंबरनाथ येथे पनवेलकर यांच्या घराबाहेर दुचाकीस्वारांनी गोळीबार केला होता. त्या वेळीही पनवेलकर यांनी हा हल्ला आमदार कथोरे यांच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप केला होता. मात्र आता गँगस्टर लाकडावाला याच्या पत्रामुळे या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. लाकडावालाने आपल्या पत्रात पनवेलकर यांच्या हत्येसाठी सुपारी देण्याचा प्रयत्न झाल्याचा उल्लेख केल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.

या पार्श्वभूमीवर पनवेलकर यांनी पोलिसांनी तात्काळ लाकडावालाचा जबाब नोंदवून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. तसेच, माझ्या जीवाला धोका असून मला पोलीस संरक्षण द्यावे, अन्यथा भविष्यात माझी हत्या होऊ शकते, अशी भीतीही पनवेलकर यांनी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी पोलिसांवर सहकार्य न केल्याचाही आरोप केला आहे.

हे ही वाचा : बाळासाहेब ठाकरेंचे व्यंगचित्र वापरुन कुणाल कामराचे हक्कभंग समितीला स्पष्टीकरण, एकनाथ शिंदेंना पुन्हा डिवचलं

सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण झाला आहे. प्रसिद्ध व्यावसायिक विश्वनाथ पनवेलकर यांनी भाजपा आमदार किसन कथोरे यांच्यावर हत्या करण्यासाठी सुपारी दिल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर सरकारच्या कार्यपद्धतीवर विरोधक आणि नागरिकांनी तीव्र टीका सुरू केली आहे. पनवेलकर यांनी दावा केला आहे की, कुख्यात गँगस्टर इजाज लकडावाला यांच्या नावाने आर्थर रोड कारागृहातून पाठवण्यात आलेल्या पत्रामध्ये या कटाचा खुलासा करण्यात आला आहे.

हे ही वाचा : हिंगोली: अशी आई असल्यापेक्षा नसलेली बरी, प्रियकराच्या नादी लागून पोटच्या लेकराला संपवलं

लाकडावालाचा नकार

या पत्रानुसार, जमीन वादातून कथोरे आणि गँगस्टर यांच्यात व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधण्यात आला होता. मात्र, गँगस्टरने हे काम करण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. पनवेलकर यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत म्हटले की, दोन वर्षांपूर्वी त्यांच्या कार्यालयावर गोळीबार झाला होता. मात्र वारंवार तक्रारी करूनही पोलिसांकडून कोणतीही ठोस सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली नाही. या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणि गुन्हेगारी नियंत्रणाच्या परिस्थितीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

दरम्यान, या गंभीर आरोपांनंतर भाजपा आमदार किसन कथोरे यांनीही ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र देत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र त्यांनी कॅमेरासमोर प्रतिक्रिया देण्यास नकार दिल्याचे समजते. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, आता पोलीस या प्रकरणाची कोणत्या दिशेने चौकशी करतात आणि सत्य काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.