Beed Crime News, रोहिदास हातागळे | बीड : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीवर तिच्याच चुलत चुलत्याने अत्याचार केल्याची घटना मागच्या दोन दिवसापूर्वी घडल्याचे समोर आले होते. नात्याला काळिमा फासेल असे कृत्य नराधम चुलत्याकडून करण्यात आले होते. या घटनेने पुन्हा एकदा जिल्ह्यात संतापाची लाट पसरली आहे. अत्याचारानंतर अल्पवयीन पीडितेने झालेला अत्याचार सहन न झाल्याने औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, या पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. अल्पवयीन पीडितेची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली,सकाळी त्या हताश झालेल्या पीडित अल्पवयीन मुलीने रुग्णालयात अखेरचा श्वास सोडला.
ADVERTISEMENT
या प्रकरणी मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, अल्पवयीन पीडिता ही तिच्या घराच्या पाठीमागील गायीच्या गोठ्यातून घरी जात असताना तिचे चुलत्याने तिला अडवून तिला बाजेवर पाडून बळजबरीने अत्याचार केला. कोणाला काही सांगितल्यास आरोपी व आरोपीचे पत्नीने जीवे मारण्याची धमकी दिली होती. चुलत चुलता आणि चुलती या दोघांनी मिळून या अल्पवयीन मुलीस शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. हा धक्का या कोवळ्या जीवाला सहन झाला नाही. आपल्याच घरातील विश्वासाच्या माणसाने आपल्यासोबत विश्वास घात केला. हा धक्का शाळेत शिकणाऱ्या सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीस सहन झाला नाही. या प्रकरणानंतर या अल्पवयीन पीडितेने विषारी औषध प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या घटनेत पीडितेची प्रकृती चिंताजनक झाली होती. या घटनेने पीडितेच्या कुटुंबावर मात्र मोठे संकट कोसळले असल्याचे समोर आले आहे.
पीडितेच्या आई वडिलांनी तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता याप्रकरणी पीडीतेच्या फिर्यादीवरून नराधम चुलत चुलता आणि त्याची पत्नी या दोघांच्या विरोधात केज येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणांमध्ये एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून दुसऱ्या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी पथक रवाना करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. पीडितेची प्रकृती गंभीर असल्या कारणावरून तिला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार करण्यासाठी मागच्या दोन दिवसापूर्वी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान या अल्पवयीन मुलीने आपले प्राण सोडले असल्याचे सांगण्यात आले आहे. अल्पवयीन पीडितेची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. ही घटना जिल्ह्यासाठी खूप गंभीर असल्याचे देखील बोलले जात आहे. या घटनेने सबंध जिल्ह्यात पुन्हा एकदा संतापाची लाट पसरली असून गावात शोककळा पसरली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











