बीडमध्ये तब्बल दोन कोटींचं बनावट खाद्य तेल कसं तयार करण्यात आलं?

मुंबई तक

09 Aug 2026 (अपडेटेड: 09 Aug 2026, 08:38 AM)

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाने (FDA) खाद्यतेलाचे बेकायदा रिपॅकिंग आणि साठवणूक करणाऱ्या बीड जिल्ह्यातील चार वेगवेगळ्या ठिकाणांवर अचानक छापे टाकून तब्बल 1 कोटी 93 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात 1 लाख 18 हजार 940 किलो खाद्यतेलाचा समावेश असून नागरिकांच्या जिवाशी चाललेला हा भयानक प्रकार उघडकीस आला आहे.

Beed Fake Edible Oil

Beed Fake Edible Oil

Google CTA

बातम्या हायलाइट

point

बीडमध्ये सापडलं दोन कोटींचं बनवाट खाद्य तेल

point

FDA च्या कारवाईने खळबळ

Beed Fake Edible Oil : आपल्या रोजच्या आहारातील खाद्यतेलात अत्यंत हानिकारक आणि विषारी रसायनांची भेसळ केली जात असल्याचा एक धक्कादायक प्रकार अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) कारवाईतून उघडकीस आला आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात भेसळखोरांविरोधात जोरदार मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेअंतर्गत एफडीएने बीड जिल्ह्यात तब्बल तीन ते चार ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करून जवळपास 1 लाख 18 हजार 940 किलो (सुमारे सव्वा लाख किलो) बनावट आणि भेसळयुक्त खाद्यतेल जप्त केले आहे. या जप्त केलेल्या तेलाची बाजारभावानुसार किंमत 1 कोटी 93 लाख रुपये, म्हणजेच तब्बल दोन कोटी रुपयांच्या घरात आहे.

हे वाचलं का?

बनावट लेबल्स लावून विक्री

बीड शहर, वडवणी आणि माजलगाव येथील ऑईल रिपॅकिंग युनिट्स आणि गोदामांवर गुप्त माहितीच्या आधारे ही धाड टाकण्यात आली. या कारवाईनंतर संबंधित दुकाने, गोदामे आणि रिपॅकिंग युनिट्सचे अन्न व्यवसाय परवाने तातडीने निलंबित करण्यात आले असून सर्व ठिकाणे सील करण्यात आली आहेत. प्राथमिक तपासानुसार, एकाच निकृष्ट दर्जाच्या खाद्यतेलाची वेगवेगळ्या नामांकित ब्रँड्सच्या नावाने विक्री केली जात होती. ग्राहकांची दिशाभूल करण्यासाठी 'रिफाईंड' आणि 'अल्ट्रा रिफाईंड' अशी बनावट लेबल्स लावून बाजारात विक्री सुरू होती. याशिवाय स्वस्त दर्जाचे पाम ऑईल, राईस ब्रँड ऑईल हे महागड्या शेंगदाणा, मोहरी किंवा तिळाच्या तेलात मिसळले जात असल्याचा आणि औद्योगिक दर्जाचे अखाद्य घटक त्यात वापरले गेल्याचा संशय आहे.

हे ही वाचा : शिक्षण, बेरोजगारी, डेटा आणि AI वरून राहुल गांधींनी RSS सह सरकारला चांगलंच फटकारलं

बनावट तेलाच्या सेवनामुळे उद्भवतात आजार

या भेसळयुक्त आणि बनावट तेलाच्या सततच्या सेवनामुळे पोटाचे विकार, उलट्या, जुलाब होण्यासोबतच यकृत (लिव्हर) आणि मूत्रपिंड (किडनी) निकामी होण्याचा धोका असतो. तसेच दीर्घकाळ असे तेल खाल्ल्यास हृदयविकाराचा (हार्ट अटॅक) झटका येण्याची शक्यता प्रचंड वाढते. एफडीएने जप्त केलेल्या तेलाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. 

हे ही वाचा : ‘दाल में काला नहीं, पूरी दाल ही...’, राहुल गांधींचा हल्लाबोल, असं का म्हणाले?

तेल खरेदी करताना काय काळजी घ्यावी?

प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर दोषींवर 'फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अ‍ॅक्ट 2006' अंतर्गत कठोर गुन्हे दाखल केले जातील, ज्यामध्ये मोठा दंड, परवाना कायमचा रद्द होणे आणि कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर, ग्राहकांनी केवळ अधिकृत ब्रँडचेच तेल खरेदी करावे, पॅकिंगवरील FSSAI परवाना क्रमांक, उत्पादन तारीख आणि बॅच नंबर तपासावा आणि संशयास्पद किंवा अवाजवी स्वस्त तेलाबाबत एफडीएच्या टोल-फ्री नंबर किंवा संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.