‘दाल में काला नहीं, पूरी दाल ही...’, राहुल गांधींचा हल्लाबोल, असं का म्हणाले?
राहुल गांधी यांनी E20 पेट्रोलवरून केंद्र सरकारवर निशाणा साधत मोठ्या अभियानाची घोषणा केली आहे. E20 पेट्रोलमुळे वाहनांची कार्यक्षमता, मायलेज आणि ग्राहकांच्या खिशावर परिणाम होत असल्याचा त्यांनी दावा केला आहे.
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: देशात E20 पेट्रोलचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी E20 पेट्रोलच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला लक्ष्य करत लवकरच मोठ्या प्रमाणावर अभियान छेडण्याचा इशारा दिला आहे. शुक्रवारी त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत E20 पेट्रोलबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले.
या व्हिडिओमध्ये राहुल गांधी एका पेट्रोल वाहनाजवळ उभे राहून E20 पेट्रोलच्या परिणामांबाबत बोलताना दिसतात. त्यांनी हा केवळ पेट्रोल किंवा वाहनांचा प्रश्न नसून सामान्य नागरिकांच्या खिशाशी संबंधित मोठा मुद्दा असल्याचं म्हटलं आहे.
‘दाल में काला नहीं, पूरी दाल ही काली’
E20 पेट्रोलवर बोलताना राहुल गांधी यांनी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. ते म्हणाले की, सामान्यपणे एखाद्या प्रकरणात ‘दाल में कुछ काला है’ असं म्हटलं जातं; मात्र E20 च्या बाबतीत ‘पूरी दाल ही काली है’, असा त्यांचा दावा आहे.
हे ही वाचा>> पैसा-पाणी: इथेनॉल मिसळलं तरी पेट्रोल मिळणार महागच!
त्यांच्या मते, देशात सध्या अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि कोणता मुद्दा आधी घ्यायचा याबाबत विरोधकांसमोर अनेक पर्याय आहेत. मात्र E20 पेट्रोलच्या प्रकरणात भ्रष्टाचाराचा मुद्दा गंभीर असल्याने तो मोठ्या प्रमाणावर उपस्थित केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
