पार्थ पवारांचा वाढता दबदबा की NCP चं विलीनीकरण? राष्ट्रवादीचे दिग्गज नेते कशामुळे अस्वस्थ?
NCP internal power struggle : अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्व आणि वर्चस्वावरून संघर्ष सुरू असल्याची चर्चा आहे. पक्षातील ज्येष्ठ आणि दिग्गज नेत्यांच्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीमागे नेमकी कोणती कारणे आहेत?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पार्थ पवारांचा वाढता दबदबा की विलीनीकरण?
राष्ट्रवादीचे दिग्गज नेते कशामुळे अस्वस्थ?
NCP internal power struggle : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्व आणि पक्षावरील वर्चस्वावरून अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. खासदार पार्थ पवार यांचा पक्ष संघटनेतील वाढता हस्तक्षेप आणि नव्या नियुक्त्यांमुळे ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे या भेटीला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार तसेच खासदार पार्थ पवार उपस्थित नव्हते. अमित शाह यांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आणि समीर भुजबळ यांचा समावेश होता. त्यामुळे पक्षातील अंतर्गत मतभेद आणि नेतृत्वाच्या प्रश्नावरून सुरू असलेल्या चर्चांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
हेही वाचा : निलेश लंकेंची जिल्हा बँकेत धमाकेदार एन्ट्री, विखे गटाच्या उमेदवाराचा दारुण पराभव
पक्ष संघटनेतील नियुक्त्यांवरुन काही ज्येष्ठ नेते नाराज असल्याची चर्चा
पक्षाच्या संघटनेत नव्या नेतृत्वाकडून घेतले जाणारे निर्णय आणि केल्या जाणाऱ्या नियुक्त्यांवर काही ज्येष्ठ नेते नाराज असल्याचे सांगितले जात आहे. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे पक्षातील इतर ज्येष्ठ नेत्यांना विश्वासात न घेता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी थेट संवाद साधत असल्याचीही नाराजी आहे. निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेले पत्र तसेच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पक्षातील भूमिकेवरूनही मतभेद असल्याची चर्चा आहे. यापूर्वी 20 ऑक्टोबरला सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतली होती. त्या वेळी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांसारखे ज्येष्ठ नेते उपस्थित नव्हते. आता याच ज्येष्ठ नेत्यांनी स्वतंत्रपणे अमित शाह यांची भेट घेतल्याने पक्षातील राजकीय समीकरणांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. महाराष्ट्र सरकारमध्ये राष्ट्रवादीला पुन्हा अर्थमंत्रिपद मिळावे, हीदेखील पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची प्रमुख मागणी आहे. यापूर्वी अर्थमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे होते. त्यांच्या निधनानंतर आगामी मंत्रिमंडळ फेरबदलात हे खाते पुन्हा राष्ट्रवादीला मिळावे, अशी भूमिका पक्षातील नेत्यांनी घेतल्याचे सांगितले जाते. 25 ऑक्टोबरला मुंबईतील अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीतही या विषयावर चर्चा झाली होती. त्या बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत अधिकृत चर्चा झालेली नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, अर्थमंत्रिपद पुन्हा मिळवण्याबाबत सहमती असल्याचे त्यांनी सांगितले होते.
हेही वाचा : सांगली जिल्हा बँकेचा पहिला निकाल जाहीर; गोपीचंद पडळकरांचा मोठा विजय; किती मतं मिळवली?
विलीनीकरणाच्या चर्चा अन् अर्थखात्याची मागणी?
दरम्यान, महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने माघार घेतल्यानेही पक्षातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. पुणे पदवीधर मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. असे असतानाही पक्षाने या निवडणुकीत उमेदवार दिला नाही. पक्षातील अनेक नेते निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र, पक्षाने माघार घेतल्याने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा जिंकता आली. यामागे शरद पवार यांच्या पक्षाला अप्रत्यक्षपणे मदत करण्याची रणनीती होती, असे काही ज्येष्ठ नेत्यांना वाटत असल्याचे सांगितले जाते. त्याचबरोबर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चाही सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावित बारामती दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या चर्चांना अधिक महत्त्व आले आहे. दोन्ही पक्षांचे विलीनीकरण झाल्यास पवार कुटुंबाचे पक्षातील राजकीय वर्चस्व वाढेल आणि आपली भूमिका मर्यादित होईल, अशी चिंता काही ज्येष्ठ नेत्यांना असल्याचे सांगितले जाते. या विलीनीकरणासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची संमती महत्त्वाची ठरणार आहे. दोन्ही गट एकत्र आल्यास केंद्रातील एनडीएला शरद पवार गटाच्या आठ खासदारांचा पाठिंबा मिळू शकतो. तसेच महाराष्ट्र सरकारमध्ये राष्ट्रवादीला पुन्हा अर्थमंत्रिपद मिळण्याचा मार्गही मोकळा होऊ शकतो.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षातील मतभेद आणि गटबाजीच्या बातम्या फेटाळल्या आहेत. पक्षाचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी अमित शाह यांच्यासोबत झालेली बैठक पूर्वनियोजित आणि औपचारिक असल्याचे सांगितले. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना जाणीवपूर्वक बाजूला ठेवण्यात आल्याच्या बातम्या चुकीच्या असल्याचा दावाही त्यांनी केला. काही राजकीय शक्ती जाणीवपूर्वक पक्षात मतभेद असल्याचे चित्र निर्माण करत असल्याचे त्यांनी म्हटले. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असून महायुतीचा महत्त्वाचा भाग असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षातील नेतृत्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एका बाजूला पवार कुटुंबाची राजकीय परंपरा आणि पार्थ पवार यांची भविष्यातील भूमिका आहे, तर दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि दिलीप वळसे पाटील यांसारख्या अनुभवी नेत्यांचा राजकीय प्रभाव आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केवळ पक्षाचे नेतृत्व कोण करणार, एवढाच प्रश्न नसून प्रत्यक्षात पक्षाची सूत्रे कोणाच्या हातात राहणार, हा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे.
