पुणे : प्रियकारासाठी प्रेमात वेडी झालेली आई, पोटच्या मुलाला पाण्यात बुडवून अन् जमिनीवर आपटून मारलं

पुण्यात एका आईने आपल्या प्रियकरासोबत राहण्यासाठी 6 वर्षांच्या पोटच्या मुलाची निर्घृण हत्या केली असून, दीड दिवसांच्या तपासानंतर पोलिसांनी या धक्कादायक प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे.

Pune Crime

Pune Crime

मुंबई तक

• 05:47 PM • 10 Apr 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

प्रियकारासाठी प्रेमात वेडी झालेली आई

point

पोटच्या मुलाला पाण्यात बुडवून अन् जमिनीवर आपटून मारलं

Pune Crime : आई म्हणजे माया आणि ममता यांचे निस्वार्थ प्रतीक मानले जाते, परंतु पुण्यातील कुरळी परिसरातून समोर आलेल्या एका घटनेने या पवित्र शब्दालाच काळिमा फासला आहे. आपल्या प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून एका निर्दयी आईने आपल्या ६ वर्षांच्या मुलाची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बसरीन मेहबूब शेख असे या आरोपी महिलेचे नाव असून, ती विवाहित आणि तीन मुलांची आई आहे. मात्र, शेजारी राहणाऱ्या राम विनायक कजेवाडसोबत तिचे प्रेमसंबंध जुळले होते. कुटुंबातील वादानंतर बसरीन काही काळ माहेरी गेली आणि त्यानंतर पुण्यात येऊन ती आपल्या प्रियकरासोबत राहू लागली होती. या अवैध नात्यात तिचा स्वतःचा ६ वर्षांचा मुलगा आवेज हा अडथळा ठरत असल्याने, त्याला वाटेतून बाजूला काढण्यासाठी आईने क्रूरतेचा कळस गाठला.

हे वाचलं का?

क्रूरतेचा कळस आणि हत्येचा बनाव

ही अंगावर काटा आणणारी घटना 4 एप्रिलच्या रात्री घडली. बसरीन आणि तिचा प्रियकर राम कजेवाड यांनी मिळून चिमुकल्या आवेजला संपवण्याचा थरकाप उडवणारा प्लॅन रचला होता. या दोघांनी आधी चिमुकल्याला पाण्याच्या बादलीत बुडवून श्वास कोंडण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्याला भिंतीवर व जमिनीवर जोरात आपटून त्याची निर्दयी हत्या केली. या भीषण कृत्यानंतर गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी मुलाचा मृतदेह कारमध्ये टाकला आणि पुण्यातून सुमारे 350 किलोमीटरचा प्रवास करत ते बीड जिल्ह्यातील धर्मापुरी या आपल्या गावी पोहोचले. तिथे त्यांनी मुलाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा बनाव रचला, जेणेकरून कोणालाही संशय येणार नाही आणि मुलावर अंत्यसंस्कार उरकता येतील.

हे ही वाचा : नववीत शिकणाऱ्या मुलीवर 10 जणांनी केला बलात्कार, मुलीनं स्वत:च सांगितली अत्याचाराची कहाणी

शवविच्छेदन अहवालातून हत्येचा पर्दाफाश

धर्मापुरी येथे पोहोचल्यानंतर मुलाचा मृत्यू संशयास्पद वाटल्याने गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली. मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आणि तिथेच या भीषण हत्याकांडाचा पर्दाफाश झाला. शवविच्छेदन अहवालात मुलाच्या शरीरावरील जखमा आणि मृत्यूचे खरे कारण समोर आल्यानंतर पोलिसांनी आईला ताब्यात घेऊन चौकशी केली. पोलीस चौकशीत बसरीन शेख हिने आपला गुन्हा कबूल केला असून आपल्या प्रियकराच्या मदतीने ही हत्या केल्याचे मान्य केले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने गुन्ह्याची कबुली दिली आहे, तर तिचा सहआरोपी राम कजेवाड हा सध्या फरार असून पोलीस पथके त्याचा शोध घेत आहेत.

हे ही वाचा : लग्नाला झाले होते फक्त 10 महिने, नवऱ्याने शेजाऱ्यासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडले, यानंतर 19 वर्षीय विवाहितेचं काय झालं?

पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून एका आईने केवळ प्रेमासाठी आपल्या काळजाच्या तुकड्याचा अशा प्रकारे बळी घेतल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी आरोपी बसरीनला अटक केली असून तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना केवळ एक गुन्हा नसून समाजातील नात्यांमधील बदलत्या आणि खालावलेल्या मूल्यांची भीषण जाणीव करून देणारी आहे. पोटच्या मुलाला जमिनीवर आपटून मारण्यापर्यंत एका आईची मजल गेल्याने माणुसकी पूर्णपणे संपल्याचे भयाण चित्र समोर आले आहे. फरार आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे तपास चक्र वेगाने फिरत असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.