Chandrapur Crime, विकास राजूरकर : चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका आईने पैशांच्या लोभापायी पोटच्या दोन मुलांचा चार लाखांना सौदा केल्याचा प्रकार घडला आहे. इतकंच नव्हे तर आपल्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या नवजात बाळाला विकण्याचाही घाट तिनं घातला होता. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी आईसह दोन खरेदीदार महिलांना अटक केली असून, न्यायालयाने आरोपी आईची 1 जूनपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे, तर खरेदीदार महिलांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या महिलेच्या नवऱ्याचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर तिची ओळख अजय फुलझेले नावाच्या व्यक्तीशी झाली होती. यानंतर दोघांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. या दोघांसोबत त्या महिलेची 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी देखील राहू लागली. दरम्यानच्या काळात, मुख्य सूत्रधार अजय फुलझेले याने या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले, ज्यामध्ये ती गर्भवती राहिली. बदनामीच्या भीतीने अजय आणि त्या मुलीच्या आईने मुलीला प्रसूतीसाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. तिथे कुणाला संशय येऊ नये म्हणून 'पुराच्या पाण्यात आमची सर्व कागदपत्रे वाहून गेली' असा बनाव रचला आणि मुलीचे वय 20 वर्षे असल्याचे सांगण्यात आले.
हे ही वाचा : 'चिमणे...परत ये गं...' रीलस्टार हॉटेल ग्रामपंचायतच्या मालकीणीची आत्महत्या, नवऱ्याची पोस्ट व्हायरल
चार लाखांना विकली मुले
मात्र, वैद्यकीय तपासणी दरम्यान डॉक्टरांना मुलीच्या वयाबाबत संशय आल्याने त्यांनी तत्परता दाखवत नागपूरच्या अजनी पोलिसांना याची माहिती दिली. अजनी पोलिसांनी तात्काळ या प्रकरणी 'झिरो एफआयआर' नोंदवून पुढील तपासासाठी हे प्रकरण चंद्रपूर पोलिसांकडे वर्ग केले. चंद्रपूरच्या रामनगर पोलिसांनी पीडित अल्पवयीन मुलीचा सविस्तर जबाब नोंदवला. पोलिसांना चौकशी दरम्यान हा प्रकार केवळ लैंगिक शोषणापुरता मर्यादित नसून यामागे बालतस्करीचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा संशय आला. त्यानुसार पोलिसांनी आरोपी मातेला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच तिने सगळी कहाणी सांगितली. तिने यापूर्वीच आपल्या दोन मुलांना प्रत्येकी दोन-दोन लाख रुपयांना विकल्याची आणि आता मुलीच्या नवजात बाळालाही विकण्याची तयारी सुरू असल्याची धक्कादायक कबुली दिली.
हे ही वाचा : प्रेयसीच्या नादी लागला, सोन्यासारख्या पत्नीला पावडर खाऊ घातली; भयंकर प्रकरण!
मुख्य सूत्रधार फरार
या संतापजनक खुलाशानंतर पोलिसांनी गुन्ह्यात मानवी तस्करी आणि पॉक्सो (POCSO) कायद्यान्वये कडक कलमे जोडली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुलांची खरेदी करणाऱ्या एका महिलेला तेलंगणातील कागजनगर येथून तर दुसऱ्या महिलेला चंद्रपूरमधून अटक केली. विकली गेलेली दोन्ही निष्पाप मुले सुखरूप असून त्यांना संरक्षणासाठी शहरातील अनाथालयात पाठवण्यात आले आहे. शनिवारी (30 मे) पोलिसांनी तिन्ही आरोपी महिलांना न्यायालयात हजर केले होते. या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आणि नराधम अजय फुलझेले हा सध्या फरार असून रामनगर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT











