छत्रपती संभाजीनगर : अंभई परिसरातील रेलगाव येथे घडलेल्या अनोख्या घटनेने सर्वत्र चर्चा रंगली आहे. गोवर्धन पूजनाच्या दिवशी पारंपरिक विधी करत असताना एका बैलाने तब्बल एक लाख रुपयांचे मंगळसूत्र गिळल्याचा प्रकार समोर आला. या घटनेनंतर तब्बल 14 दिवसांनी बैलावर शस्त्रक्रिया करून ते मंगळसूत्र बाहेर काढण्यात आले. विशेष म्हणजे, या प्रयत्नात दागिना मिळवण्यात यश तर आलेच, पण बैलाचे प्राणही वाचले.
ADVERTISEMENT
नैवेद्य समजून बैलाने मंगळसूत्र गिळलं, शेतकऱ्याने शेणातून बाहेर पडेल म्हणून वाट पाहिली
सिल्लोड तालुक्यातील रेलगाव गावातील शेतकरी केवलसिंह श्रीभान चिल्हारे यांच्या घरी 22 ऑक्टोबर रोजी गोवर्धन पूजनाचा कार्यक्रम होता. या दिवशी बैलांची पूजा करताना त्यांच्या कुटुंबातील महिलांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण केले. औक्षणाच्या वेळी त्यांनी सोन्याचे मंगळसूत्र बैलाच्या माथ्याला लावण्यासाठी घेतले. पण बैलाला वाटले की, ताटात ठेवलेला नैवेद्य त्याच्यासाठी आहे, आणि क्षणातच त्याने संपूर्ण मंगळसूत्र गिळले.
घटनेनंतर चिल्हारे कुटुंबाने काही दिवस बैलावर लक्ष ठेवले. शेणातून मंगळसूत्र बाहेर पडते का, हे पाहण्यासाठी ते दररोज निरीक्षण करत होते. परंतु अनेक दिवस वाट पाहूनही काहीच निष्पन्न न झाल्याने अखेर त्यांनी पशुवैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा : लघुशंका करतानाचा Video झाला व्हायरल, लोकांनी छळलं; नंतर 'त्या' तरूणाने...
सेवानिवृत्त सहायक पशुधन विकास अधिकारी डॉ. जी. एल. पाटेवाड यांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यांनी 5 नोव्हेंबर रोजी रेलगाव येथे जाऊन बैलाची तपासणी केली. एक्स-रेद्वारे मंगळसूत्र पोटात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले. तब्बल दोन तास चाललेल्या या जटिल ऑपरेशननंतर डॉक्टरांनी मंगळसूत्र सुरक्षितपणे बाहेर काढले.
चिल्हारे यांना या शस्त्रक्रियेसाठी सुमारे दहा हजार रुपयांचा खर्च आला. मात्र, मंगळसूत्र मिळाल्याचा आणि बैलाची तब्येतही ठणठणीत असल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. या घटनेने संपूर्ण गावात कौतुकाची आणि दिलासा देणारी चर्चा सुरू झाली आहे. “मंगळसूत्र मिळालं आणि बैलही वाचला, यापेक्षा मोठं समाधान दुसरं नाही,” असे चिल्हारे कुटुंबीयांनी सांगितले. गावातील अनेकांनी डॉक्टर पाटेवाड यांच्या कौशल्याचे कौतुक केले.
या संपूर्ण प्रकारातून एक वेगळी शिकवण मिळाली.श्रद्धा आणि परंपरेत भावना असल्या तरी दक्षता आवश्यक असते. कारण क्षणात एखादी साधी पूजा एका जीवघेण्या प्रसंगात बदलू शकते. सुदैवाने या वेळी संकट टळले आणि चिल्हारे कुटुंबाचे मंगळसूत्र आणि बैल दोन्ही सुरक्षित राहिले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











