लघुशंका करतानाचा Video झाला व्हायरल, लोकांनी छळलं; नंतर 'त्या' तरूणाने...
छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाच्या पिवळ्या बोर्डखाली लघुशंका करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने महेश आढे या तरूणाने स्वत:चं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना जालन्यात घडली आहे.
ADVERTISEMENT

गौरव साळी, जालना: सोशल मीडियाच्या क्रूर खेळाने आणखी एका तरुणाचे जीवन उद्ध्वस्त झाले. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाच्या पिवळ्या बोर्डखाली लघुशंका करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे त्रासदायक मेसेज आणि येणाऱ्या धमक्यांमुळे 22 वर्षीय महेश आढे या तरुणाने आज (5 नोव्हेंबर) सकाळी गावाजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. जालन्याच्या परतूर तालुक्यातील ठोकमळ तांडा येथील रहिवासी असलेल्या महेशच्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नातेवाईकांनी व्हायरल व्हिडिओ शेअर करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
घटनेची पार्श्वभूमी
काही दिवसांपूर्वी, म्हणजे 30 ऑक्टोबर रोजी, छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरील पिवळ्या बोर्डखाली महेश आढे आणि त्याचा मित्र नशेत असताना लघुशंका करत होते. ही बेजबाबदार कृत्य करताना तिथे उपस्थित एका व्यक्तीने त्यांचा व्हिडिओ काढला आणि तो थेट इन्स्टाग्रामवर अपलोड केला. व्हिडिओत दोघेही नशेत असल्याचे दिसत होते, ज्यामुळे सोशल मीडियावर हा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल झाला. शहरात या घटनेवर संताप व्यक्त झाला असला तरी, व्हिडिओ व्हायरल होण्याचे खरे परिणाम महेश आणि त्याच्या मित्रावरच उमटले.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजे 31 ऑक्टोबरला, महेश आणि त्याच्या मित्राने एक माफीचा व्हिडिओ जारी केला. यात त्यांनी आपल्या कृत्याबद्दल खेद व्यक्त करून सर्वांसमोर माफी मागितली. "आम्ही नशेत असल्यामुळे असं घडलं, आम्हाला माफ करा," असं ते म्हणाले. मात्र, माफी मागितल्यानंतरही सोशल मीडियावर त्यांचा मुख्य व्हिडिओ व्हायरल होत राहिला. यात महेशचा पूर्ण पत्ता, फोन नंबर आणि वैयक्तिक माहिती जोडून शेअर करण्यात आली होती. ज्यामुळे त्यांना रोज अज्ञात नंबरवरून धमकीचे मेसेज आणि कॉल्स येत होते.










