Chhatrapati Sambhajinagar News : सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथे आयुर्वेदिक वनस्पतींच्या शोधात गेलेले राजू बाबूराव राजगुरे ऊर्फ कमलगिरी महाराज (वय 58) गुरुवारी सकाळी मुर्डेश्वर डोंगरावरून सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळले. गंभीर जखमी झालेल्या महाराजांच्या बचाव कार्य व उपचारास विलंब झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
वनौषधी शोधत असताना पाय घसरून दरीत कोसळले
कमलगिरी महाराज हे श्री कमलगिरी मठ देवस्थान विश्वस्त मंडळाचे सदस्य होते. त्यांचा मठ जटवाडा रोडवरील हरिओमनगर येथील प्लॉट क्रमांक 28 येथे आहे. गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास ते सिल्लोडमधील केळगाव येथील श्री क्षेत्र मुर्डेश्वरपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावरील मुर्डेश्वर डोंगरावर गेले होते. तेथे वनौषधी शोधत असताना पाय घसरून ते दरीत कोसळले. या अपघातात त्यांच्या हात-पायांसह संपूर्ण शरीराला गंभीर दुखापत झाली होती.
हेही वाचा : अजित पवारांच्या निधनापूर्वीचा शेवटचा Video आला समोर, कोणी समोर आणला तो व्हिडिओ?
घटनेची माहिती मिळताच परिसरात गर्दी जमली. मात्र, दुर्गम व अवघड भूभागामुळे बचावकार्यास विलंब झाला. मुर्डेश्वर येथील एकनाथ कोठाळे, समाधान कोठाळे व सीताराम इवरे यांनी मदतीसाठी दरीत उतरून प्रयत्न केले. महाराज गंभीर जखमी असले तरी काही काळ शुद्धीत होते. दरीत अडकून असताना त्यांनी सुमारे दोन लिटर पाणी प्यायले; मात्र गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.
महाराजांना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी सुमारे 200 फूट मार्ग तयार केला. सकाळी 9 वाजता दरीत कोसळलेल्या महाराजांना दुपारी 4 वाजता, सात तासांच्या प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात आले. दरीत अडकलेल्या अवस्थेत त्यांनी पत्नी व मुलगा वैभवशी मोबाइलद्वारे संपर्क साधला होता. मुलगा दुपारी 3 वाजता घटनास्थळी पोहोचला. बाहेर काढल्यानंतर रुग्णवाहिकेतून सिल्लोड रुग्णालयात नेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. महाराजांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. या घटनेमुळे केळगाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आई वडिलांनी मुलाला जेवण आणण्यासाठी घराबाहेर पाठवले, नंतर घरात गळफास घेत दोघांनीही जीवन संपवलं
ADVERTISEMENT











