Dharashiv News, गणेश जाधव : धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपतालुकाप्रमुखाने कांदा पिकामध्ये बेकायदेशीररीत्या अफूची लागवड केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या कारवाईत 485 किलो 650 ग्रॅम वजनाची अफूची झाडे जप्त करण्यात आली असून, याची अंदाजे किंमत 72 लाख 84 हजार 750 रुपये इतकी आहे. दि. 11 फेब्रुवारी 2026 रोजी वाशी तालुक्यातील मौजे दशमेगाव शिवारात एका शेतात लपूनछपून अफूची लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ कारवाईचे आदेश दिले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : महाराष्ट्रातलं असं एक गाव जिथं आंतरजातीय विवाह थाटात लावले जाणार! 'जातमुक्ती'साठी ऐतिहासिक निर्णय
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सर्व्हे क्रमांक 163, मौजे दशमेगाव येथे पाहणी केली असता कांदा पिकाच्या आंतरपिकामध्ये मोठ्या प्रमाणात अफूची लागवड आढळून आली. सदर अफूच्या झाडांना पांढऱ्या व गुलाबी रंगाची फुले तसेच मोठी बोंडे असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. हे शेत समाधान मनोहर उघडे (रा. दशमेगाव, ता. वाशी, जि. धाराशिव) यांचे असल्याचे निष्पन्न झाले असून, आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी त्यांनीच ही लागवड केल्याची माहिती पोलिसांना दिली. नायब तहसीलदार वाशी व दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत ही अफूची झाडे जप्त करण्यात आली.
या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 45/2026 अन्वये एनडीपीएस कायदा 1985 कलम 8 (क) व 18 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार व वाशी पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
हे ही वाचा : जळती चिता पोलिसांनी विझवली; अर्धवट जळालेला मृतदेह का घेतला ताब्यात, नेमकं काय घडलं?
ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेकडे लक्ष
धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे गेल्या काही काळापासून जिल्ह्यात अवैध व्यवसाय, दोन नंबरचे धंदे आणि समाजविघातक प्रवृत्तींच्या विरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. विशेषतः तुळजापूर येथील भाजपाचे पदाधिकारी व तत्कालीन नगराध्यक्ष विनोद उर्फ पिंटू गंगणे यांच्या कथित ड्रग्जप्रकरणातील सहभागावरून ओमराजे निंबाळकर यांनी जाहीरपणे तीव्र विरोध दर्शवला होता. त्या वेळी त्यांनी आपल्या भाषणांत सांगितले होते की, दोन नंबर काम करणाऱ्या, समाजविघातक कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांना राजकारणात स्थान देऊ नका. आम्ही फक्त स्वच्छ चारित्र्याच्या लोकांनाच राजकारणात सोबत घेतो. मात्र आता त्यांच्याच पक्षाच्या वाशी उपतालुकाप्रमुखाच्या शेतात मोठ्या प्रमाणात अफूची शेती आढळून आल्याने राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली आहे.
एकीकडे अवैध व्यवसायांविरोधात ओमराजे निंबाळकर रान उठवत असतानाच, दुसरीकडे त्यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यावर इतका गंभीर गुन्हा उघडकीस आल्याने या प्रकरणात ओमराजे निंबाळकर काय भूमिका घेतात, पक्षांतर्गत कोणती कारवाई होते, याकडे संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचे विशेषतः वाशी तालुक्याचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT











