शिरपूर : शिरपूर शहरातील गवळी वाडा परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने परिसरातील नागरिकांना हळहळ व्यक्त करायला लावली आहे. झोक्यावर खेळताना गळफास लागल्याने गंभीर जखमी झालेल्या नऊ वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कृष्णा प्रभाकर पाटील (वय 9) असे मृत बालकाचे नाव असून, या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
ADVERTISEMENT
नऊ वर्षीय मुलाच्या मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 21 ऑक्टोबर) दुपारच्या सुमारास कृष्णा आपल्या राहत्या घरात झोक्यावर खेळत होता. खेळताना अचानक त्याचा तोल गेला आणि झोक्याच्या दोरीत त्याचा गळा अडकला. काही क्षणातच तो शुद्ध हरपून खाली कोसळला. घरातील सदस्यांनी आरडाओरड ऐकून धाव घेतली आणि कृष्णाला गळ्यातून दोरी सोडवून तातडीने जवळच्या नगरपालिका रुग्णालयात दाखल केले.
हेही वाचा : जालना: सात ते आठ जणांकडून तरुणावर लोखंडी रॉडसह लाठी काठीने हल्ला, 'त्या' कारणावरून तरुणाला रात्रीच संपवलं
पालिकेतील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी धुळ्यातील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना बुधवारी (दि. 22) सकाळी कृष्णाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातही शोककळा पसरली आहे. अचानक घडलेल्या या घटनेने पालकांना तसेच नातेवाईकांना धक्का बसला आहे. खेळताना लहान मुलांवर लक्ष ठेवणे किती आवश्यक आहे, याची जाणीव या प्रसंगाने सर्वांना झाली आहे, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
घटनेची माहिती मिळताच शिरपूर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद (ए.डी. नंबर) केली आहे. पुढील तपास शिरपूर शहर पोलिस करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी घरगुती खेळणी आणि झोके वापरताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन स्थानिक नागरिकांकडून करण्यात आले आहे. कृष्णाच्या निधनामुळे गवळी वाडा परिसर शोकमग्न झाला असून, अंत्यसंस्कार करताना वातावरणात हळहळ दाटून आली. छोट्याशा खेळाने एका निष्पाप जीवाचा बळी घेतल्याने संपूर्ण शिरपूर शहरात या घटनेची चर्चा सुरू आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











