डोंबिवली : सोशल मीडियावर स्वतःला रील स्टार म्हणून मिरवणाऱ्या शैलेश रामुगडे या युवकाचा मोठा गैरप्रकार समोर आला आहे. त्याने इन्स्टाग्रामवरुन उच्चशिक्षित, मोठ्या कंपनीत नोकरी करणाऱ्या तरुणींशी मैत्री केली. त्यानंतर तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून पैसे, दागिने हडपवले आहेत. या प्रकरणी रीलस्टारला पोलिसांनी अटक केली आहे. विष्णूनगर पोलिसांनी रीलस्टारकडून 37 लाखांचे दागिने, 1 कोटी रुपये किमतीची बीएमडब्ल्यू कार आणि चार महागडे आयफोन जप्त केले आहेत.
ADVERTISEMENT
प्रेमाच्या जाळ्यात ओढून कोट्यावधींची माया जमवली
डोंबिवलीतील एका उच्चभ्रू कुटुंबातील तरुणीचे महागडे दागिने अचानक गायब झाल्याची घटना घडली. चौकशीदरम्यान तरुणीने ते दागिने आपल्या प्रियकराला म्हणजे शैलेश रामुगडेला दिल्याचे सांगितल्यावर कुटुंबियांनी लगेच पोलिसांकडे धाव घेतली. शैलेशने स्वतःला प्रसिद्ध रील स्टार, दोन वेबसीरीजमध्ये काम केलेला कलाकार म्हणून दाखवत अनेक तरुणींना फसविले असल्याचा आरोप आहे. यापूर्वीही ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात दोन महिलांची फसवणूक केल्याचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.
पोलिसांनी राहत्या घरातून उचललं
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे आणि पोलीस निरीक्षक गहिनीनाथ सर्जेराव गमे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. तपासात डोंबिवलीतल्या अनेक तरुणींना शैलेशने अशाच प्रकारे फसवल्याचे समोर आले. ठाण्यातील हिरानंदानी येथील त्याच्या राहत्या घरातून त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून दागिने, बीएमडब्ल्यू कार आणि महागडे आयफोन जप्त करण्यात आले आहेत.
असंख्य तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून कोट्यावधी जमवले
शैलेश इन्स्टाग्रामद्वारे तरुणींशी संपर्क करायचा. प्रेमाचा दिखावा करून “ईडीची रेड पडली”, “घरी प्रॉब्लेम आहे”, “पैशांची तातडीची गरज आहे” अशा असंख्य बहाण्यांनी तो पैसे व दागिने उकळून त्यांना सोडून द्यायचा. फसवणूक झालेल्या तरुणींमध्ये उच्चशिक्षित तसेच आयटी क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत तरुणींचाही समावेश आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी सांगितले की, या प्रकरणात अजून तक्रारी येण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











