Gadchiroli Crime, व्यंकटेश दुधमवार : गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या दुर्दैवी प्रकारामुळे चार निष्पाप मुलांच्या डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र हरपले असून, संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
ADVERTISEMENT
धानोरा तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या रोपीनगड्डा गावातील रहिवासी कनिष्ठा राकेश कुजूर (वय 32) आणि राकेश सुकणा कुजूर (वय 37) हे या घटनेतील मृत दाम्पत्य आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 5 जानेवारी रोजी दोघेही शेतात धान कापणीचे काम आटोपून “घरी जातो” असे सांगून निघाले होते. मात्र, त्यानंतर ते घरी पोहोचलेच नाहीत. दोन दिवसांनंतर, 7 जानेवारीला गावाजवळील गागीरमेटा डोंगर परिसरात कनिष्ठा कुजूर यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. त्यांच्या डोक्यावर दगडाने जोरदार वार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
पत्नीचा मृतदेह सापडल्यानंतर पती राकेश कुजूर याचा शोध सुरू करण्यात आला. अखेर 8 जानेवारी रोजी राकेशचा मृतदेह त्याच्याच शेतात आढळून आला. प्राथमिक तपासात पत्नीच्या हत्येनंतर पश्चात्ताप, भीती किंवा अटकेच्या भीतीपोटी त्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा : उद्धव ठाकरे म्हणाले, अभिषेक असता तर भाजपची हिंमत झाली नसती; आता तेजस्वी घोसाळकरांचं जोरदार प्रत्युत्तर
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर धक्कादायक बाब समोर आली आहे. राकेश कुजूर याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेण्याची सवय होती. दारूच्या नशेत तो वारंवार पत्नीशी भांडण करत असे. त्यांच्या वादांमुळे गावात तणाव निर्माण झाला होता. याच कारणामुळे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात गावात पंचायतही बसवण्यात आली होती. त्या वेळी राकेशला समज देण्यात आली होती आणि काही काळ परिस्थिती शांतही झाली होती. मात्र, पुन्हा एकदा संशयाच्या भुताने त्याचा ताबा घेतला आणि सुखी कुटुंबाचा अंत झाला.
या घटनेत मानवी (12), मेहमा (9), अर्णव (7) आणि शालिनी (5) ही चार लहान मुले अनाथ झाली आहेत. यातील तीन मुले देऊळगाव येथील आश्रमशाळेत शिक्षण घेत आहेत. आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आता या चारही मुलांच्या संगोपनाची जबाबदारी त्यांच्या 80 वर्षीय आजोबा सुकणा कुजूर यांच्या खांद्यावर आली आहे. उतारवयात मुलगा-सून गमावल्यानंतर नातवंडांच्या भविष्याची चिंता त्यांना भेडसावत आहे.
या प्रकरणी पेंढरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी गोपीचंद लोखंडे यांनी सांगितले की, “कौटुंबिक वाद आणि चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या केली असून, त्यानंतर स्वतः आत्महत्या केली आहे. घटनेचा सखोल तपास सुरू आहे.” या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, समाजमनाला हादरवून टाकणारा हा प्रकार ठरला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











