Gauri Palave funeral in front of Anant Garje house Preparations : पाथर्डी तालुक्यातील देवडे गावात राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांच्या मृत्यू प्रकरणानंतर तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. गौरीच्या मृत्यूला जबाबदार अनंत गर्जे असल्याचा आरोप करत तिच्या नातेवाईकांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी अनंतच्या घरासमोरच गौरीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा आग्रह धरला असून परिसरात मोठा गोंधळ उडाला आहे.
ADVERTISEMENT
गौरीने अनंतच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळेच अंत्यविधी गर्जे यांच्या घरासमोर करण्याची नातेवाईकांची मागणी आणखी तीव्र झाली आहे. परिस्थिती गंभीर बनू नये म्हणून पाथर्डी पोलिसांनी मौज देवडे गावात तातडीने बंदोबस्त उभारला आहे. पोलिस अधिकारी नातेवाईकांशी सतत संवाद साधत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
मुंबईतील वरळी येथे शनिवारी राहत्या घरी गौरी पालवे (वय 28) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. फक्त नऊ महिन्यांपूर्वीच अनंत गर्जेशी तिचा विवाह मोठ्या थाटामाटात झाला होता. मात्र पतीचे कथित अनैतिक संबंध आणि सततचे वाद यामुळे गौरी तणावात असल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले. या आरोपांनंतर वरळी पोलिसांनी अनंत गर्जे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
हेही वाचा : बॅरियर तोडून ट्रक झाला पलटी, पुणे-मुंबई महामार्गावरील भीषण अपघातात कारचा चेंदामेंदा, दोघांचा दुर्दैवी अंत...
पत्नीच्या मृत्यूनंतर अनंत गर्जे स्वतःच पोलिस ठाण्यात हजर झाला असून तपासाला पूर्ण सहकार्य करण्याची तयारी असल्याचे त्याने सांगितले. प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा आणि सत्य समोर यावे, अशी त्याची भूमिका आहे.
गौरी पालवे ही मूळची बीड जिल्ह्यातील आहे. वडील अशोक पालवे हे वैद्यकीय योग प्रशिक्षक तर आई परिचारिका. बीडीएस पदवी घेतल्यानंतर गौरीने सेंट जॉर्ज रुग्णालयात डेन्टल असिस्टंट म्हणून काम केले आणि नंतर सायन हॉस्पिटलमध्ये डेन्टल सर्जन म्हणून नोकरी सांभाळली. लग्नानंतर दोघे वरळीत राहत होते. मात्र काही काळातच वाद वाढू लागले. अनंत किरकोळ कारणांवरूनही भांडत असे, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली.
घटनेच्या आदल्या रात्री अनंतने गौरीच्या वडिलांना दोन मिस्ड कॉल दिल्यानंतरही प्रतिसाद न दिल्याने संशय वाढला. शनिवारी संध्याकाळी अनंतने फोन करून “गौरी सुसाइड करतेय, तिला समजवा” असे सांगितले. मात्र तिला फोन दिला नाही आणि थेट रुग्णालयात नेत असल्याची माहिती देत कॉल कट केला.
गौरीचे मामा शिवदास गर्जे यांनी गंभीर आरोप करत “ही आत्महत्या नसून हत्या असू शकते,” असा संशय व्यक्त केला. पतीचे कथित संबंध, सततचे वाद आणि तिच्यावरचा मानसिक ताण यामुळे ती खचली होती. जर गौरी आत्महत्या करत होती, तर अनंतने तिला रोखले का नाही? तो घटनास्थळावरून पळून का गेला? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. दरम्यान, देवडे गावात मोठा आक्रोश असून नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी अनंतच्या घरासमोरच जमले आहेत. त्यामुळे गावात तणावपूर्ण वातावरण असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कडक बंदोबस्त तैनात केला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











