Hotel Bhagyashree: 'नाद करती काय..' हॉटेल भाग्यश्री आता भलत्याच गोष्टीमुळे चर्चेत!

हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांनी सोशल मीडियाच्या चतुर वापराने महाराष्ट्रात आपलं नाव पोहोचवलं, पण मागील दिवसांपासून हे हॉटेल आता वादविवादमुळे चर्चेत आलं आहे.

Hotel Bhagyashree

Hotel Bhagyashree

मुंबई तक

• 08:14 PM • 30 Jun 2025

follow google news

तुळजापूर: तुळजापूरमधील हॉटेल भाग्यश्री  हे “नाद करती काय, यावचं लागतंय” या हटके टॅगलाइनमुळे अवघ्या महाराष्ट्रात प्रचंड चर्चेत आलं आहे. हॉटेल भाग्यश्री आणि त्याचे मालक नागेश मडके यांनी सोशल मीडियावर आणि महाराष्ट्रभर एकच धुमाकूळ घातलाय. फक्त 250 रुपयांमध्ये अनलिमिटेड मटण थाळी, झणझणीत चव, आणि मालकाची अनोखी मार्केटिंग स्टाईल यामुळे हे हॉटेल चर्चेचा विषय बनलं आहे. पण याबरोबरच वादविवाद, तोडफोड आणि हाणामारीच्या घटनांमुळेही हॉटेल भाग्यश्री सतत चर्चेत आहे. 

हे वाचलं का?

हॉटेल भाग्यश्रीची यशोगाथा

हॉटेल भाग्यश्री तुळजापूर-धाराशिव रोडवर, बुरी गावाजवळ, पेट्रोल पंपासमोर आहे. नागेश मडके यांनी हे हॉटेल सुरू केलं तेव्हा कुणालाही वाटलं नव्हतं की एका साध्या धाब्याचं रूपांतर महाराष्ट्रातील सर्वात चर्चित हॉटेलमध्ये होईल. हॉटेलची खासियत आहे त्यांची अनलिमिटेड मटण थाळी जी फक्त 250 रुपयांमध्ये मिळते. यात मटण, रस्सा आणि झणझणीत चव यांचा समावेश आहे. याचबरोबर, स्थानिक उस्मानाबादी बोकड मटणाची चव ही या हॉटेलची खरी ओळख आहे. उस्मानाबादी बोकड हे देशभर प्रसिद्ध आहे, आणि याच मटणामुळे हॉटेल भाग्यश्रीला ग्राहकांची गर्दी वाढत गेली.

हे ही वाचा>> ताट, लाटणं, उलाथणं घेऊन बदडलं, तरूणाला घेरून चोपलं...हॉटेल भाग्यश्रीवर पुन्हा काय राडा?

नागेश मडके यांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत आपल्या हॉटेलचं मार्केटिंग केलं. त्यांच्या "नाद करती काय? यायलाच लागतंय!" या डायलॉगने इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाखो लोकांचं लक्ष वेधलं. त्यांच्या रील्समध्ये ते हॉटेल बंद असण्याची कारणं सांगतात - कधी वाढदिवस, कधी तब्येत, तर कधी बाहेरगावी जाणं. या रील्समुळे त्यांना काही लोकांनी ट्रोल केलं, पण याच रील्सनी हॉटेलला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली.

फॉर्च्युनर गिफ्ट आणि व्हायरल स्टोरी

हॉटेलच्या यशाचं शिखर तेव्हा गाठलं, जेव्हा नागेश मडके यांनी आपल्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त 45 लाखांची टोयोटा फॉर्च्युनर गाडी गिफ्ट केली. "हत्ती घेतला हत्ती!" असं म्हणत त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या गाडीच्या खरेदीने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलेला. नागेश यांनी सांगितलं की, त्यांच्या यशाचं श्रेय त्यांच्या पत्नीच्या साथीला आहे, आणि म्हणूनच त्यांनी तिला ही भेट दिली.

दगडफेक आणि हाणामारीच्या घटना

हॉटेल भाग्यश्रीचं यश आणि प्रसिद्धी यामुळे काहींच्या डोळ्यात खुपलं. 8 जून 2025 रोजी हॉटेल बंद असल्याने काही अज्ञात तरुणांनी हॉटेलवर दगडफेक करत बॅनर आणि बोर्ड फाडले. यामुळे सुमारे 70 हजार रुपयांचं नुकसान झालं. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झालेला.

हे ही वाचा>> आता 'यासाठी' हॉटेल भाग्यश्री बंद ठेवण्याचा घेतला मालकाने निर्णय!

पंधरा दिवसांनंतर पुन्हा एकदा, 15 जून 2025 रोजी, हॉटेलवर दगडफेक झाली. या घटनांमुळे स्थानिक मराठी उद्योजकांनी तीव्र निषेध व्यक्त केला. 

आज (30 जून 2025) रोजी हॉटेल भाग्यश्री हे पुन्हा चर्चेत आलं, यावेळी काही तरुणांनी अचानक हॉटेलच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. ज्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. यामुळे संतप्त झालेल्या नागेश मडके यांनी आता पोलिसात तक्रार दाखल केली असून हॉटेलच्या बदनामीसाठी हा प्रकार सुरू असल्याचा आरोप केला आहे.

नागेश मडके हे फारसे शिक्षित नसतानाही मेहनत आणि सोशल मीडियाच्या चतुर वापराने आपलं नाव महाराष्ट्रभर पोहोचवलं. त्यांच्या फॉर्च्युनर गाडीच्या रील्सने तरुणांना व्यवसायाकडे वळण्याचा संदेश दिला. 

हॉटेल व्यवसायातील तीव्र स्पर्धा

धाराशिव, लातूर, बीड, सोलापूर या भागात मटण हॉटेल्सची तीव्र स्पर्धा आहे. अनेक  हॉटेल्सही ग्राहकांना आकर्षित करत आहेत. पण भाग्यश्रीचं युनिक मार्केटिंग आणि चव यामुळे ते वेगळे ठरतात. मात्र, वारंवार होणाऱ्या तोडफोडीच्या घटनांमुळे हॉटेलच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

    follow whatsapp