मुंबई: मुंबईतील घाटकोपर पूर्व येथील कामराज नगरचे रहिवासी आणि भारतीय सैन्य दलातील जवान मुरली नाईक (वय 23 वर्ष) यांनी आज (9 मे) पहाटे 3 वाजता भारत-पाकिस्तान सीमेवरील युद्धजन्य परिस्थितीत आपल्या प्राणांची आहुती देत वीरगती प्राप्त केली. शहीद जवान मुरली नाईक यांचे पार्थिव अंत्यविधीकरिता त्यांच्या मूळ गावी उद्या (10 मे) सायंकाळी आणण्यात येणार आहे. अशी माहिती पंजाब येथील लष्कराच्या कार्यालयातून कळविण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
कोण आहेत मुरली नाईक?
मुरली नाईक हे घाटकोपर (पूर्व) येथील कामराज नगरमधील श्रीराम नाईक यांचे ज्येष्ठ पुत्र होते. मुरली नाईक हे 2022 साली भारतीय लष्करात रुजू झाले होते. त्यांची ट्रेनिंग देवळाली, नाशिक येथे झाली होती. ते पहिल्यांदा आसाम येथे पोस्टिंगला होते. त्यानंतर ते पंजाब येथे तैनातीस असताना त्यांना युद्धादरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये उरी या ठिकाणी कर्तव्यावर पाठविण्यात आले होते. त्याच दरम्यान ते शहीद झाले.
बॉर्डरवर नेमकं काय घडलं?
सोशल मीडियावरील माहितीनुसार, 9 मे 2025 च्या पहाटे भारत-पाकिस्तान सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. या संघर्षादरम्यान झालेल्या चकमकीत मुरली नाईक हे शहीद झाले. दरम्यान, या घटनेबाबत लष्कराकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, परंतु स्थानिक कार्यकर्ते आणि सोशल मीडियावरील पोस्ट यावरून ही माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा>> IPL 2025 Suspended: अजिबात नाराज व्हायचं नाही, IPL चाहत्यांसाठी आता BCCI कडून मोठी घोषणा!
मुरली नाईक यांचं संपूर्ण कुटुंब हे घाटकोपरमधील कामराज नगर येथील वस्तीत राहत होते. मात्र, काही दिवसांपूर्वीच येथे नव्याने इमारती उभारण्याचं काम सुरू झाल्याने मुरली नाईक यांचं कुटुंब काही काळापुरतं आंध्र प्रदेशमधील आपल्या मूळ गावी राहण्यासाठी गेलं होतं. तर मुरली नाईक हे मात्र, लष्करात कर्तव्यावर होते.
मुरली नाईक यांच्या बलिदानाची बातमी समजताच घाटकोपर परिसरात शोककळा पसरली. स्थानिक नागरिकांनी आणि राजकीय नेत्यांनी त्यांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त केल्या. भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी मुरली यांच्या बलिदानाला "देशाच्या रक्षणासाठी सर्वोच्च त्याग" असे संबोधत श्रद्धांजली वाहिली.
हे ही वाचा>> What is S-400 Defence System: भारताचं हे आहे 'सुदर्शन चक्र', पाकला कळण्याआधीच खेळ होतो खल्लास.. खासियत तर विचारूच नका!
देशभरातून श्रद्धांजली
सोशल मीडियावर #MurliNaik आणि #IndianArmy या हॅशटॅग्ससह मुरली नाईक यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. अनेकांनी त्यांच्या बलिदानाला म्हणत सलाम केला. एका पोस्टमध्ये असे म्हटले आहे, "घाटकोपरचे सुपुत्र मुरली नाईक यांनी आपल्या प्राणांची आहुती देत देशाचे रक्षण केले. त्यांचा हा त्याग प्रत्येक भारतीयाच्या हृदयात कायम राहील."
मुरली नाईक यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर आणि कामराज नगरातील नागरिकांवर मोठा आघात झाला आहे. स्थानिक नागरिकांनी मुरली यांचे एक नम्र आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्ती म्हणून स्मरण केले. त्यांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी स्थानिक नेते आणि कार्यकर्ते पुढे सरसावले आहेत.
ADVERTISEMENT
