KBC 18 crorepati Bhushan Thakare, मुंबई : एखाद्या तरुणाच्या खिशात मुंबईत पाऊल ठेवताना अवघे 24 रुपये असतील, तर या मायानगरीत तो किती दिवस तग धरेल, असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. पण याच 24 रुपयांच्या जोरावर मोठं स्वप्न घेऊन मुंबईत आलेला जळगावचा भूषण ठाकरे (Bhushan Thakare) आता कोट्याधीश झालाय. अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती' (KBC) च्या 18 व्या पर्वात भूषणने तब्बल 1 कोटी रुपये जिंकत पहिला करोडपती होण्याचा मान मिळवलाय.
ADVERTISEMENT
भूषणच्या या यशामागे केवळ ज्ञान किंवा नशिबाची साथ नाही, तर आई-वडिलांची अपार मेहनत, हलाखीच्या परिस्थितीशी दिलेला लढा आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी दाखवलेली जिद्द आहे. एकीकडे कोट्यवधींची बक्षिसे जिंकण्याची संधी असलेल्या या शोमध्ये भूषणने 1 कोटींचा टप्पा पार केला आहे, तर दुसरीकडे त्याच्या आयुष्यातील संघर्षाची कहाणी ऐकून प्रेक्षक आणि खुद्द अमिताभ बच्चनही भावुक झाले.
"आयुष्यात काहीतरी करून दाखवल्याशिवाय घरी येणार नाही..."
हॉटसीटवर अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद साधताना भूषणने आपल्या आयुष्यातील संघर्षाचा पट उलगडला. भूषण म्हणाला, "मी गेल्या दीड वर्षांपासून घरी गेलेलो नाही. माझं वय 28 वर्षे आहे. मी आतापर्यंत आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर व्हायला हवं होतं, पण तसं होऊ शकलं नाही. त्यामुळेच मी आई-वडिलांना सांगितलं होतं की, आयुष्यात काहीतरी चांगलं करून दाखवल्याशिवाय मी घरी परत येणार नाही."
हे ही वाचा>> सलग दुसऱ्यांदा पडळकरांचा गेम? सांगली भाजपमधूनच होतोय 'करेक्ट कार्यक्रम'?
भूषणच्या या निर्णयामागे त्याच्या आई-वडिलांनी उपसलेले अपार कष्ट आहेत. त्याचे वडील मजुरी करून कुटुंबाचा गाडा चालवायचे, तर आईची प्रकृती सातत्याने खालावलेली असायची. आईवर आतापर्यंत सुमारे 8 ते 9 शस्त्रक्रिया झाल्या आहेत. इतकी बिकट परिस्थिती असतानाही वडिलांनी मजुरीच्या पैशांतूनच पत्नीच्या उपचारांचा खर्च भागवला आणि भूषणचं शिक्षण पूर्ण केलं. भूषणच्या आईनेही स्वतःची प्रकृती साथ देत नसताना 200-300 रुपये मजुरी करून किंवा अडचणीच्या वेळी कुठून ना कुठून पैशांची जुळवाजुळव करून कुटुंबाला सावरल्याचं भूषणने भावुक होऊन सांगितलं.
"तू मजुरी करू नकोस, फक्त अभ्यास कर..."
भूषणच्या यशाचा पाया त्याच्या आई-वडिलांच्या अपार कष्टांवर उभा आहे. आपल्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा प्रसंग सांगताना भूषणने वडिलांच्या कणखर पाठिंब्याची आठवण सांगितली. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना एका टप्प्यावर त्याला महाविद्यालयात प्रवेश मिळाला नव्हता, त्यामुळे तो घरीच बसून अभ्यास करत होता. कुटुंबावरील आर्थिक भार हलका करण्यासाठी आपणही काहीतरी काम करावं, या विचाराने भूषण गावातील नदीवर काम करू लागला.
हे ही वाचा>> Personal Finance: सोनं विकत घेण्याऐवजी सोन्यावर कर्ज देणाऱ्या कंपन्यांमध्ये लावा पैसे!
मात्र, वडिलांना ते अजिबात मान्य नव्हतं. "तू घरी बस किंवा तुझं शिक्षण पूर्ण कर, पण मजुरी करायची नाही," असं खडसावत वडिलांनी भूषणला मजुरीपासून दूर ठेवलं आणि केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं. त्याच विश्वासाच्या बळावर भूषणने 'केबीसी'च्या मंचावर आपल्या ज्ञानाची चुणूक दाखवली आहे.
जळगावसारख्या शहरातून अवघ्या 24 रुपयांसह मुंबईत येण्यापासून ते 'केबीसी 18' च्या हॉटसीटवर 1 कोटी रुपये जिंकण्यापर्यंतचा भूषण ठाकरेचा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. कोणत्याही मोठ्या आर्थिक पाठबळाशिवाय केवळ जिद्द, अभ्यास आणि कुटुंबाच्या त्यागाची जाणीव माणसाला किती उंचीवर नेऊ शकते, याचं जिवंत उदाहरण भूषण ठाकरेने घालून दिलं आहे.
ADVERTISEMENT












