Jalna Crime, गौरव साळी : जालन्यातील चंदनझिरा भागात झालेल्या जितेंद्र रवि आडसूळ (वय 35, रा. बदनापूर) या तरुणाच्या हत्याकांडाचा पोलिसांनी अवघ्या चार तासांत छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून हत्येसाठी वापरण्यात आलेली दोन धारदार खंजीर आणि एक मोटारसायकल जप्त केली आहे. जुन्या वैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, या कारवाईमुळे शहरात निर्माण झालेला तणाव काहीसा निवळला आहे.
ADVERTISEMENT
शस्त्रांनी केले सपासप वार
मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र आडसूळ 7 मे च्या रात्री चंदनझिरा भागातून जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जितेंद्रला स्थानिक नागरिकांनी तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर मृताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 3(5) नुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक तेगबिर सिंह संधू यांनी तातडीने तपासाचे चक्रे फिरवून आरोपींना पकडण्याचे आदेश दिले होते.
हे ही वाचा : Pune: तुरूंगातून बाहेर आला आणि 5 दिवसातच हत्या, तरूणीसोबत 'नको ते' करणं बेतलं जीवावर!
दोन अल्पवयीन मुलं ताब्यात
पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपासाला सुरुवात केली. संशयित आरोपी सिल्लोड येथील तांडा बाजार भागात लपून बसल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी तिथे छापा टाकून दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी आपला गुन्हा कबूल केला असून, वर्ष 2021 मध्ये जितेंद्र आडसूळ यानेच त्यांच्या वडिलांची हत्या केली होती, असा खुलासा केला. त्याच हत्येचा बदला घेण्यासाठी या दोन्ही मुलांनी जितेंद्रचा काटा काढण्याचे ठरवले आणि हा जीवघेणा हल्ला केला.
हे ही वाचा : Personal Finance: जर तुमचा PAN लीक झाला, तर होईल प्रचंड नुकसान.. याल खूपच अडचणीत
तिसरा आरोपी फरार
या कारवाईत पोलिसांनी आरोपींच्या निशाण्यावरून सुंदरनगर भागातून गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे आणि वाहन जप्त केले आहे. या हत्याकांडात आणखी एका तिसऱ्या साथीदाराचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून, पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत. अवघ्या काही तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्याबद्दल पोलीस प्रशासनाचे कौतुक होत आहे. चंदनझिरा पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत असून, लवकरच तिसऱ्या आरोपीलाही अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT











