MPSC पेपरफुटी प्रकरणात चार्जशीट दाखल.. तपासात काय सापडलं?

स्वानंद बिक्कड

25 Nov 2026 (अपडेटेड: 25 Nov 2026, 10:09 AM)

MPSC Drug Inspector Exam Paper Leak Case : MPSC औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटी प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने 3 हजारांहून अधिक पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. 300 प्रश्न लॅपटॉपवर टाईप करून पेपरफुटी केल्याचा आरोप असून, आतापर्यंत 13 जणांना अटक झाली आहे.

MPSC Drug Inspector Exam Paper Leak Case

MPSC Drug Inspector Exam Paper Leak Case

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

MPSC पेपरफुटी प्रकरणात चार्जशीट दाखल..

point

तपासात आत्तापर्यंत काय काय सापडलं?

MPSC Drug Inspector Exam Paper Leak Case : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) माध्यमातून अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक (Drug Inspector) पदाच्या 154 जागांसाठी 22 मार्च 2026 रोजी परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, या परीक्षेचा पेपर आधीच फुटल्याचा प्रकार समोर आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई गुन्हे शाखेने आता न्यायालयात 3 हजारांहून अधिक पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या आरोपपत्रानुसार, MPSC मधील सहायक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नकाते याला या पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हटले आहे. नकाते याने प्रश्नपेढीतील सुमारे 300 प्रश्न लॅपटॉपवर टाईप केले. त्यानंतर या प्रश्नांची प्रिंट काढून नवी मुंबईतील कार्यालयाच्या पार्किंगमध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याला दिल्याचा आरोप आहे. हा प्रकार उघडकीस आल्यास वरिष्ठ अधिकाऱ्याचा आधार मिळावा, यासाठी त्याने अवर सचिव अभिजीत लेंडवे यालाही सोबत घेतल्याचा आरोप आरोपपत्रात करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : Personal Finance: दागिने तेच, पण बिल हजारोंनी कमी! सोनं खरेदी करताना 'या' 5 गोष्टी नका विसरू

पालकांनी आत्महत्येची धमकी अन् ऋतुजाचे गौरवशी बोलणे बंद

या प्रकरणाचा उलगडा प्रेमसंबंध आणि त्यातून निर्माण झालेल्या वादामुळे झाल्याचे तपासात समोर आले आहे. परीक्षेच्या तात्पुरत्या गुणवत्ता यादीत सातव्या क्रमांकावर आलेली उमेदवार ऋतुजा पाटील आणि तिचा प्रियकर लोकेश उर्फ गौरव पाटील यांच्यातील वादातून पेपरफुटीची माहिती समोर आली. गौरवने 21 जुलै रोजी MPSC ला ईमेल पाठवून परीक्षेचा पेपर आधीच फुटल्याची तक्रार केली होती. मात्र, काही दिवसांनंतर त्याने ही तक्रार खोटी असल्याचे सांगत ती मागे घेण्याचा प्रयत्न केला. ऋतुजाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिच्या प्रेमसंबंधांना घरच्यांचा विरोध होता. पालकांनी आत्महत्येची धमकी दिल्यामुळे तिने परीक्षा झाल्यानंतर गौरवशी बोलणेही बंद केले होते. याच रागातून गौरवने पेपर आधीच मिळाल्याची माहिती उघड केल्याचे समोर आले. त्यानंतर 27 जुलै 2026 रोजी MPSC ने पोलिसांत तक्रार दिली. प्राथमिक तपासात पेपरफुटी सिद्ध झाल्यानंतर 25 ऑगस्ट रोजी संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली.

हेही वाचा : पुणे : .. खून करुन तो पहाटेपर्यंत डेड बॉडीजवळ बसून होता..

आतापर्यंत या प्रकरणात एकूण 13 जणांना अटक, दोन जण फरार 

या प्रकरणात 26 ऑगस्ट रोजी पहिली अटक करण्यात आली. सुरुवातीला सहा आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले. यामध्ये MPSC अधिकारी विश्वेश्वर नकाते, अभिजीत लेंडवे आणि गोपाळ मराठे यांच्यासह मध्यस्थ म्हणून काम केल्याचा आरोप असलेले प्रवीण पाटील, उमेदवार ऋतुजा पाटीलचे वडील अमृत पाटील आणि तिचा प्रियकर गौरव पाटील यांचा समावेश आहे. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात ऋतुजा पाटीललाही अटक करण्यात आली. आतापर्यंत या प्रकरणात एकूण 13 जणांना अटक झाली असून दोन आरोपी अद्याप फरार आहेत. उर्वरित आरोपींविरोधात डिसेंबरमध्ये पुरवणी आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भरती प्रक्रिया रद्द झाली असली तरी दोषींवर कठोर कारवाई करावी आणि MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी पुण्यातील एस. एम. जोशी पुलाजवळ सलग 11 दिवस आंदोलन केले होते.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर ऑक्टोबर महिन्यात राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय चौकशी समिती जाहीर केली. या समितीत FDA आयुक्त तुकाराम मुंडे सचिव म्हणून काम पाहत आहेत. ही समिती दोन महिन्यांत पेपरफुटी प्रकरणासह आयोगाच्या एकूण कामकाजाची चौकशी करणार आहे. समितीच्या घोषणेनंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. चौकशी पूर्ण होईपर्यंत MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार 12 ऑक्टोबरपासून रजेवर गेले आहेत. दरम्यान, मार्च महिन्यात पदभार स्वीकारण्यापूर्वीच जानेवारी महिन्यात हा संपूर्ण प्रकार घडल्याचे स्पष्टीकरण विवेक भीमनवार यांनी यापूर्वी दिले होते. आता मुंबई गुन्हे शाखेने दाखल केलेल्या तीन हजारांहून अधिक पानांच्या आरोपपत्रामुळे या प्रकरणातील तपासाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील उर्वरित आरोपी, पुरवणी आरोपपत्र आणि चौकशी समितीचा अहवाल याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.