Mumbai News : मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि 'डब्ल्यूआरआय इंडिया' यांच्या संयुक्त विद्यमाने 'बीकेसी साप्ताहिक सार्वजनिक वाहतूक दिन' उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या मोहिमेतर्गत बीकेसीमधील विविध कंपन्या, कार्यालये आणि तेथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना दर शुक्रवारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था किंवा शेअर्ड वाहनांचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.
ADVERTISEMENT
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या एका गोलमेज परिषदेत या उपक्रमाची घोषणा करण्यात आली. या परिषदेला वरिष्ठ शासकीय अधिकारी, वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ आणि कॉर्पोरेट कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सर्वांनी मिळून दररोज बीकेसीमध्ये येणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांमध्ये सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवण्याचा संकल्प केला आहे.
खासगी अन् सार्वजनिक वाहतूक
एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार, बीकेसी हे भारतातील सर्वांत मोठ्या व्यावसायिक केंद्रांपैकी एक आहे. या ठिकाणी सुमारे दोन लाख औपचारिक आणि त्याहून अधिक अनौपचारिक रोजगार उपलब्ध आहेत. देशातील आघाडीच्या 'बीएसई सेन्सेक्स'मधील 75 टक्के आणि 'निफ्टी 50' निर्देशांक असलेल्या 50 टक्के कंपन्यांची कार्यालये याच परिसरात आहेत.
या परिषदेत सादर करण्यात आलेल्या आकडेवारीवरून बीकेसीमधील वाहतूक पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण येत असल्याचे समोर आले आहे. येथील तब्बल 52 टक्के नोकरदार अजूनही खासगी वाहने, टॅक्सी किंवा ऑटो-रिक्षांवर अवलंबून आहेत, तर केवळ 25 टक्के लोक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात. धक्कादायक बाब म्हणजे, येथील निम्म्याहून अधिक कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी दररोज दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागतो, तर 20 टक्के लोकांना प्रवासात तीन तासांपेक्षा अधिक वेळ घालवावा लागतो.
हे ही वाचा : पती नर्सचा किस करताना दिसला, डॉक्टर महिलेला सहन झालं नाही; अन्...
सर्वेक्षणातून महत्त्वाची माहिती समोर
असे असले तरी, बीकेसीमधील प्रवाशांची सार्वजनिक वाहतुकीकडे वळण्याची सकारात्मक मानसिकता असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. जर सार्वजनिक वाहतूक सेवा अधिक विश्वासार्ह, आरामदायी आणि सोयीस्कर झाली, तर 82 टक्के प्रवासी तिचा वापर करण्यास तयार आहेत. या उपक्रमाबाबत बोलताना एमएमआरडीएचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी म्हणाले की, बीकेसी हे शाश्वत शहरी गतिशीलतेचे एक आदर्श मॉडेल बनू शकते. सार्वजनिक आणि शेअर्ड वाहतुकीचा अल्प वापर जरी वाढला, तरी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. यामुळे प्रवासाचा वेळ वाचेल, कार्बनचे उत्सर्जन कमी होईल आणि नागरिकांचे जीवनमान सुधारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हे ही वाचा : बायकोचा 'त्या' गोष्टीला नकार, नवऱ्याने थेट शेवटच केला, कुणाचा जीव गेला?
मेट्रो बीकेसीच्या परिघात
सध्याच्या घडीला बीकेसीमधील सार्वजनिक वाहतूक कनेक्टिव्हिटी झपाट्याने विस्तारत असतानाच हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. 'मेट्रो लाईन 3' मुळे या परिसरातील वाहतूक आधीच सुलभ झाली आहे. त्यातच आगामी 'मेट्रो लाईन 2बी' आणि 'मेट्रो लाईन 4' चे काम पूर्ण झाल्यानंतर, संपूर्ण बीकेसी व्यावसायिक केंद्र मेट्रो स्टेशनपासून अवघ्या एक किलोमीटरच्या परिघात येईल, असे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे. यामुळे भविष्यात या उपक्रमाला मोठी गती मिळण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT











