बलात्कारामुळे प्रेग्नंट झालेल्या 15 वर्षीय मुलीला गर्भपात करण्यास परवानगी, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Mumbai High Court big decision : शेजाऱ्याने केलेल्या बलात्कारामुळे प्रेग्नंट झालेल्या 15 वर्षीय मुलीला गर्भपातास परवानगी, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Mumbai High Court big decision

Mumbai High Court big decision

मुंबई तक

08 Nov 2025 (अपडेटेड: 08 Nov 2025, 09:27 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बलात्कारामुळे प्रेग्नंट झालेल्या 15 वर्षीय मुलीला गर्भपातास परवानगी

point

मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

मुंबई : शेजाऱ्याने केलेल्या बलात्कारामुळे प्रेग्नंट झालेल्या 15 वर्षीय मुलीस गर्भपात करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे पीडितेच्या मानसिक आणि शैक्षणिक आयुष्याला नवी दिशा मिळणार आहे. मुलीची मानसिक स्थिती आणि वय देखील कमी आहे. अशा परिस्थितीत गर्भ टिकवणे तिच्या मानसिक आरोग्यासाठी गंभीर धोका ठरू शकतो, असं निरिक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. त्यामुळे पीडितेला दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे.

हे वाचलं का?

वैद्यकीय मंडळाने न्यायालयात काय सांगितलं?

ही पीडित मुलगी दहावीमध्ये शिक्षण घेत आहे आणि ती सुमारे 27 आठवड्यांची गर्भवती होती. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि संदेश पाटील यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी करत वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. 24 आठवड्यांहून अधिक गर्भावस्थेवर वैद्यकीयदृष्ट्या गर्भपाताबाबत निर्णय देण्याचे अधिकार त्यांच्याकडे नाहीत. मात्र, न्यायालयाला वाटत असल्यास की गर्भ टिकवल्याने मुलीला तीव्र मानसिक वेदना आणि भावनिक त्रास होईल, तर गर्भपातास परवानगी दिली जाऊ शकते, असं या वैद्यकीय मंडळाने अहवालात नमूद केले होते.

वकिलांनी न्यायालयात काय युक्तीवाद केला?

या प्रकरणात न्यायालयीन मदतीने नेमण्यात आलेल्या वकिल स्वप्ना कोडे यांनी मुलीच्या बाजूने युक्तिवाद केला. त्यांनी सांगितले की, पीडित मुलगी तिचे शिक्षण सुरू ठेवू इच्छिते आणि मार्च 2026 मध्ये दहावीची परीक्षा देण्याची तिची इच्छा आहे. मुलीचे पालक मजूर म्हणून काम करतात आणि त्यांनीही आपल्या मुलीच्या गर्भपातास लेखी संमती दिली आहे. घटना उघडकीस आली ती तेव्हा, जेव्हा मुलीचे चार महिने मासिक पाळीचे चक्र थांबले होते. वैद्यकीय तपासणीत ती गर्भवती असल्याचे समोर आले. त्यानंतर तिने आईसमोर कबुली दिली की, तिच्या शेजाऱ्याने जुलै महिन्यात दोनदा तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. या प्रकरणी पवई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यायालयाने या प्रकरणात सादर झालेल्या मानसोपचार तज्ज्ञांच्या अहवालाचा उल्लेख केला. मानसोपचार विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. मुझाहिद शेख यांच्या अहवालानुसार, मुलीचे आयक्यू (IQ) फक्त 80 असून ती ‘बॉर्डरलाइन इंटेलेक्च्युअल फंक्शनिंग’ स्थितीत आहे. त्यामुळे ती शारीरिक, आर्थिक आणि भावनिकदृष्ट्या बालकाची काळजी घेण्यास सक्षम नाही. गर्भ टिकवल्यास तिला नैराश्य येऊ शकतं आणि मानसिक विकासात अडथळे निर्माण होण्याची शक्यता असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले.

मानसशास्त्रज्ञ झैनब खान यांनीही आपल्या अहवालात नमूद केले की, अशा स्थितीतील मुलांमध्ये मानसिक प्रक्रिया मंद असते. नियोजन आणि समस्या सोडविण्याची क्षमता कमी असते तसेच भावनिकदृष्ट्या ते अधिक अवलंबून आणि अपरिपक्व असतात. त्यामुळे गर्भ टिकवल्यास मुलीच्या मानसिक विकासावर गंभीर परिणाम होऊ शकतो. या सर्व अहवालांचा सखोल अभ्यास केल्यानंतर खंडपीठाने मुलीच्या गर्भपातास परवानगी देत तो प्रक्रिया राज्यातील मान्यताप्राप्त जे.जे. रुग्णालयात करण्याचे आदेश दिले. तसेच राज्य सरकारला मनोधैर्य योजना अंतर्गत पीडितेला लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

बीड नगरपरिषदेच्या इमारतीवर कर्मचाऱ्याचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

 

 

 

    follow whatsapp