Death in Lift : मुंबईतील कुर्ला भागात असलेल्या 'शमीम टॉवर'मध्ये सोमवारी (6 जून) रात्री एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना घडली. इमारतीच्या 10 व्या मजल्यावर मित्रांसोबत खेळत असताना एका 12 वर्षांच्या निष्पाप मुलाचा लिफ्टच्या शाफ्टमध्ये (मोकळ्या जागेत) पडून दुर्दैवी मृत्यू झाला. जैन शेख असे या मृत मुलाचे नाव आहे. अपघात झाला तेव्हा लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर स्थिर होती, ज्यामुळे 10 व्या मजल्यावरून पडलेला जैन थेट लिफ्टच्या छतावर जाऊन आदळला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जैनला तातडीने सायन रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ आणि तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ADVERTISEMENT
लिफ्टचा दरवाजा अचानक उघडला अन्...
प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार रात्री 9 वाजताच्या सुमारास 12 वर्षांचा जैन शेख आपल्या मित्रांसोबत 10 व्या मजल्यावरील कॉरिडोअरमध्ये खेळत होता. खेळता खेळता तो लिफ्टच्या बाहेरील लोखंडी दरवाजाला हात लावून उभा राहिला. मात्र, तांत्रिक बिघाड किंवा देखभालीतील निष्काळजीपणामुळे, लिफ्ट त्या मजल्यावर आलेली नसतानाही अचानक बाहेरचा दरवाजा उघडला गेला. अचानक दरवाजा उघडल्याने जैनचा स्वतःवरील ताबा सुटला आणि तो थेट अंधाऱ्या शाफ्टमध्ये खाली कोसळला. या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून, त्यात जैनने दरवाजाला हात लावताच तो उघडल्याचे आणि क्षणार्धात तो आत कोसळल्याचे स्पष्ट दिसत आहे. आपल्या मित्राला डोळ्यांदेखत नाहीसे झालेले पाहून इतर मुलांनी घाबरून आरडाओरडा करत खाली धाव घेतली.
हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यावर पावसाचं संकट, 'या' जिल्ह्यांत तुफानी पाऊसl; 7 जिल्ह्यांवर आस्मानी संकट
10 व्या मजल्यावरुन थेट तिसऱ्या मजल्यावर
मुलांचा आरडाओरडा ऐकून इमारतीमधील रहिवासी मदतीसाठी धावले. 10 व्या मजल्यावरून पडलेला जैन तिसऱ्या मजल्यावर थांबलेल्या लिफ्टच्या वर पडून तडफडत असल्याचे त्यांनी पाहिले. सोसायटीच्या लोकांनी अत्यंत शिताफीने जैनला लिफ्टच्या छतावरून बाहेर काढले. त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्याला तात्काळ सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही त्याचे प्राण वाचू शकले नाहीत. या घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक पोलीस उपायुक्तांनी (DCP) रात्रीच फौजफाट्यासह घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. सध्या या प्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी एडीआर (अपघाती मृत्यू) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
हे ही वाचा : नाशिकमध्ये उद्या होणार प्रचंड मोठी ढगफुटी; CM फडणवीसांनी स्वत:च दिली माहिती, रेड अलर्ट जारी!
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
या संपूर्ण भीषण अपघातानंतर आता निष्काळजीपणाचा जबाबदार कोण? असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. अनधिकृतपणे बोलताना पोलीस उपायुक्तांनी स्पष्ट केले की, सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. तपास अहवाल समोर आल्यानंतर सोसायटीचे व्यवस्थापन किंवा लिफ्टची देखभाल करणारी कंपनी (लिफ्ट मेंटेनन्स कंपनी) यांपैकी जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्याविरुद्ध निष्काळजीपणाचा आणि सदोष मनुष्यवधाचा गंभीर फौजदारी गुन्हा दाखल करून कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
ADVERTISEMENT












