Nagpur Crime : नागपूर पोलीस दलात मोठी खळबळ उडालेली असून ऑनलाइन बेटिंग आणि फसवणुकीच्या प्रकरणात सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी (इंचार्ज) यांच्यासह एकूण नऊ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईत 2 इन्स्पेक्टर, 1 एपीआय आणि 6 कॉन्स्टेबल्सचा समावेश आहे. पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी यासंदर्भात कडक पावले उचलत निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. बलिराम सुतार, योगेश घारे, विजय राणे, प्रफुल्ल ठाकरे, सतीश वाघ, श्रीकांत गोनेकर, सुशील चंगोले, अजय पवार आणि सौरभ हिवरकर अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
ADVERTISEMENT
आर्थिक गैरव्यवहार आणि कर्तव्यात कसूर
ऑनलाइन सट्टा व्यवसायाशी संबंधित एका गुन्ह्यात आरोपीकडून कोट्यवधी रुपयांची आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा संशय आल्याने ही चौकशी सुरू करण्यात आली होती. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील तपासणीत काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत संशयास्पद असल्याचे निष्पन्न झाले. चौकशीदरम्यान संबंधितांचे जबाब नोंदवण्यात आले आणि तपासाचा प्राथमिक अहवाल पोलीस आयुक्तांना सादर करण्यात आला. या अहवालात आर्थिक गैरव्यवहार आणि कर्तव्यातील कसूर यांसारखे गंभीर मुद्दे समोर आल्याने ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
हे ही वाचा : एक कुटुंब, तीन आमदार, तीन पक्ष..'या' कुटुंबाला लागला जॅकपॉट
पोलिसांचे गुन्हेगारांशी साटेलोटे
विशेष म्हणजे, या सायबर पोलीस ठाण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत वाद आणि तणावाचे वातावरण होते. काही दिवसांपूर्वीच एका अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली होती, ज्यावरून पोलीस ठाण्यातील विसंवाद चव्हाट्यावर आला होता. या अंतर्गत कलहाची दखल घेऊन वरिष्ठ स्तरावर सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले होते. या चौकशीत केवळ अंतर्गत वादाचेच पदर उलगडले नाहीत, तर ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यांचे गुन्हेगारांशी असलेले साटलोटे देखील समोर आले.
हे ही वाचा : अकोला : आई-वडील मजूरीला गेले अन् घडलं भयानक, 60 वर्षीय शेजाऱ्याने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार
निलंबनाच्या वृत्ताला दुजोरा
नागपूर पोलीस दलातील या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ माजली असून, भ्रष्टाचार करणाऱ्या आणि गुन्हेगारांना साथ देणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट संकेत यातून देण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या निलंबनाच्या वृत्ताला दुजोरा दिला असून, या प्रकरणाची पुढील चौकशी अधिक तीव्र केली जाणार आहे. ऑनलाइन गुन्हे रोखण्याची जबाबदारी असलेल्या सायबर ठाण्यातच अशा प्रकारचा गैरव्यवहार घडल्याने पोलीस प्रशासनाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
ADVERTISEMENT











