Maharashtra Crime Jilha Parish teacher murder, विकास राजूरकर : चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथून हत्येची एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. पतीची सरकारी नोकरी आणि निवृत्तीनंतर मिळणारे ग्रॅज्युईटीचे पैसे हडपण्यासाठी एका पत्नीनेच आपल्या पतीच्या हत्येचा कट रचला. 46 वर्षीय जिल्हा परिषद शिक्षक रवींद्र कुलमेथे यांची हत्या करण्यासाठी त्यांच्या पत्नीने दीपमाला कुलमेथे (वय 42) हिने चक्क एक लाख रुपयांची सुपारी दिली होती. या संपूर्ण कटाची कल्पना दीपमालाच्या मैत्रिणीने तिला दिली होती, ज्यानुसार 30 एप्रिल रोजी रवींद्र यांची कारमध्ये गळा आवळून हत्या करण्यात आली. भद्रावती पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत या प्रकरणात पत्नी आणि तिच्या मैत्रिणीसह एकूण चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
ADVERTISEMENT
मैत्रिणीचा अघोरी सल्ला आणि हत्येचा प्लॅन; एक लाख रुपयांत ठरली सुपारी
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, मृत रवींद्र आणि त्यांची पत्नी दीपमाला गेल्या अनेक वर्षांपासून वेगळे राहत होते. दीपमालाने पोलिसांना सांगितले की, पतीकडून होणाऱ्या कथित शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून तिने हे पाऊल उचलले. नागपूर येथे उपचारादरम्यान तिची भेट वर्षा परचाके या महिलेशी झाली, जिने तिला पतीचा काटा काढल्यास त्याची नोकरी आणि पैसे मिळतील असा सल्ला दिला. यानंतर दीपमालाने वर्षा आणि अन्य आरोपींना एक लाख रुपयांची सुपारी देऊन पतीचा फोटो त्यांच्या हवाली केला. ठरलेल्या कटानुसार, 29 एप्रिल रोजी दीपमालाने पतीला एका लग्नासाठी बोलावले आणि 30 एप्रिलला शिक्षकाला मारेकऱ्यांच्या कारमध्ये बसवून दिले, जिथे निर्जन स्थळी नेऊन त्यांची हत्या करण्यात आली.
संशयास्पद मृतदेह आणि कॉल डिटेल्समुळे फुटले बिंग; चार आरोपी जेरबंद
भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घोडपेठ परिसरातील 2 मे रोजी सकाळी हनुमान मंदिराजवळ रवींद्र कुलमेथे यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. त्यांच्या गळ्याभोवती प्लास्टिकची पिशवी आणि पांढरा स्कार्फ घट्ट बांधलेला असल्याने पोलिसांना हत्येचा संशय आला. मृतदेहाजवळ मिळालेल्या मोबाईलच्या कॉल डिटेल्सवरून मृत व्यक्तीची ओळख पटली आणि तपासाची चक्रे फिरली. पोलिसांनी 3 मे रोजी दीपमाला आणि तिची मैत्रीण वर्षा हिला वरोरा येथून, तर 4 मे रोजी सोनू उर्फ प्रवीण कालोकर आणि नाझीर अंसारी यांना नागपूरमधून अटक केली. आरोपींकडून हत्येसाठी वापरलेली कार आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून, न्यायालयाने त्यांना 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सरकारी नोकरी मिळवण्याचा होता अमानुष हेतू; पोलिसांनी केला खुलासा
भद्रावती पोलीस ठाण्याचे निरीक्षक योगेश पारधी यांनी सांगितले की, मृत रवींद्र हे शिक्षक होते परंतु ते ड्युटीवर जात नसत आणि पत्नीपासून वेगळे राहत होते. पती-पत्नीमधील वाद आणि संपत्तीचा लोभ यातून हा गुन्हा घडला आहे. पतीच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्त्वावर स्वतःला सरकारी नोकरी मिळावी आणि ग्रॅच्युइटीचे लाखो रुपये हाताशी यावेत, या एकमेव उद्देशाने दीपमालाने आपल्या मैत्रिणीच्या मदतीने हा कट पूर्ण केला. शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्याने मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून, आरोपींच्या कबुलीनाब्यावरून हा पूर्णतः पूर्वनियोजित खून असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या भद्रावती पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











