Mumbai News : मुंबईकरांना अखेर उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. आज, 21 जूनच्या सकाळी मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झाला. भीषण उष्णता आणि प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आलेला हा पहिलाच पाऊस आहे. पहिल्याच पावसानंतर नागरिक उत्साहाने घराबाहेर पडले. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुरुवातीच्या तासांमध्ये घाटकोपरमध्ये 24 मिमी, वरळीत 25 मिमी, लोअर परळमध्ये 21 मिमी आणि चेंबूरमध्ये 20 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान, आयएमडीने 22 आणि 23 जूनसाठी मुंबईत 'येलो अलर्ट' जारी केला असून, या काळात 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. आगामी आठवड्यात, विशेषतः 25 आणि 26 जून रोजी मान्सून अधिक तीव्र होऊन मुंबईत जोरदार पाऊस पडू शकतो, तर 23 जूनच्या सुमारास मान्सून महाराष्ट्राच्या इतर भागांतही पुढे सरकण्याची शक्यता आहे.
पावसाला विलंब का झाला?
दक्षिण-पश्चिम मान्सून आठवड्यापूर्वीच मुंबईत दाखल झाला होता आणि अरबी समुद्रातही भरपूर आर्द्रता होती; मात्र वातावरणातील 'एंट्रेनमेंट' (Entrainment) प्रक्रियेमुळे पाऊस पडण्यास इतका विलंब झाला. जूनच्या सुरुवातीला कुलाबा हवामान केंद्रात अवघा 4.3 मिमी पाऊस नोंदवला गेला, जो सामान्यपेक्षा तब्बल 90 टक्क्यांनी कमी होता. या अल्प पावसामुळे जूनच्या मध्यापर्यंत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयातील पाणीसाठा केवळ 9 ते 10 टक्क्यांवर येऊन ठेपला होता. मुंबईत पाऊस आणण्यासाठी कारणीभूत ठरणारे 'क्युम्युलोनिम्बस' (Cumulonimbus) ढग निर्माण होत असताना, हवेतील कोरड्या थराने घातलेला खोडा या विलंबामागे मुख्य कारण ठरला.
हे ही वाचा : उद्धव ठाकरे फुटीर खासदारांच्या मतदारसंघात, दौरा ठरला; निशाण्यावर कोण?
शनिवारीच झाला हवामानात बदल
हवामान तज्ज्ञांच्या मते, जेव्हा जमिनीवरील गरम आणि दमट हवा वेगाने वर जाते आणि थंड होऊन पाण्याचे थेंब बनतात, तेव्हा हे पावसाचे ढग तयार होतात. मात्र, गेल्या काही दिवसांत वातावरणाच्या मध्य थरात कोरडी हवा ठाण मांडून बसली होती. या कोरड्या हवेमुळे दमट हवेतील आर्द्रता ती शोषून घेत होती. ढगांमधील पाण्याचे थेंब पूर्ण तयार होण्यापूर्वीच ते सुकवले जात असल्यामुळे ढगांची उंची पाऊस पडण्याइतकी वाढू शकत नव्हती. अखेर शनिवारी रात्री या कोरड्या हवेची पकड ढिली झाली आणि मुंबईच्या हवामानात एक मोठा आणि सकारात्मक बदल पाहायला मिळाला.
हे ही वाचा : नर्तकीला बघताच तरुणांची नियत बिघडली, स्टेजवरून ओढत निर्जनस्थळी नेलं अन्..
मुंबईकरांची प्रतीक्षा संपली
शनिवारी संध्याकाळपासूनच मुंबईच्या आकाशात 'रेनबँड' (Rainbands) तयार होताना दिसत होते. रेनबँड म्हणजे हवेच्या दिशेने एका रेषेत आलेल्या अनेक छोट्या वादळी ढगांचा समूह असतो, जो समुद्राकडून मिळणाऱ्या सततच्या आर्द्रतेमुळे मोठ्या क्षेत्रावर दीर्घकाळ पाऊस पाडतो. याचसोबत, अरबी समुद्राकडून येणारे दमट वारे जेव्हा पश्चिम घाटाच्या पर्वतांना धडकून वेगाने वर गेले, तेव्हा तिथे 'पॉप-अप' ढग निर्माण झाले. हे दाट ढग वाऱ्याच्या प्रवाहामुळे पश्चिमेकडे सरकले आणि त्यांनी मुंबईकरांची प्रतीक्षा संपवून रविवारी सकाळी संपूर्ण परिसराला तृप्त केले.
ADVERTISEMENT











