Agniveervayu Recruitment : भारतीय हवाई दलात (Indian Air Force) देशसेवेची सुवर्णसंधी शोधत असलेल्या तरुणांसाठी एक मोठी बातमी आहे. हवाई दलातर्फे 'अग्निवीरवायु' या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेसाठी एकूण जागांची संख्या अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नसली, तरीही संपूर्ण भारतातील इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या सुवर्णसंधीचा लाभ घेता येणार आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 6 जुलैपासून होणार असून 26 जुलै ही अंतिम मुदत आहे. यासाठी 550 रुपये परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे.
ADVERTISEMENT
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी शैक्षणिक आणि शारीरिक पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे. उमेदवारांनी किमान 50 टक्के गुणांसह गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी विषयातून 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, कॉम्प्युटर सायन्स, इन्स्ट्रुमेंटेशन किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांपैकी कोणत्याही शाखेतून 50 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा पूर्ण केलेला असावा. याशिवाय, गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवारही पात्र ठरतील. या भरतीसाठी उमेदवाराचा जन्म 1 जुलै 2005 ते 1 जानेवारी 2010 या दरम्यान झालेला असावा.
हे ही वाचा : 6 खासदार फुटल्यानंतर आदित्य ठाकरे संतापले, काय म्हणाले?
वेतन किती मिळणार?
'अग्निवीरवायु' म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना चार वर्षांच्या सेवाकाळात आकर्षक मानधन पॅकेज दिले जाईल. पहिल्या वर्षी दरमहा 30,000 रुपये, दुसऱ्या वर्षी 33,000 रुपये, तिसऱ्या वर्षी 36,500 रुपये आणि चौथ्या वर्षी 40,000 रुपये मासिक वेतन असेल. या एकूण वेतनातील 70 टक्के रक्कम उमेदवाराला थेट हातामध्ये मिळेल, तर उर्वरित 30 टक्के रक्कम 'अग्निवीर कॉर्पस फंड' (Agniveers Corpus Fund) मध्ये जमा केली जाईल. विशेष म्हणजे, जितकी रक्कम उमेदवाराच्या वेतनातून कापली जाईल, तितकीच समप्रमाणात रक्कम भारत सरकारकडूनही या फंडात जमा करण्यात येईल. चार वर्षांच्या कालावधीत उमेदवाराचे एकूण योगदान सुमारे 5.02 लाख रुपये इतके होणार आहे.
हे ही वाचा : मुंबईची खबर : BEST कर्मचाऱ्यांचा संप, मुंबईकरांचे हाल! काय आहेत मागण्या?
अधिक माहितीसाठी
चार वर्षांचा सेवाकाळ यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर जेव्हा अग्निवीर वायुसेनेतून बाहेर पडतील, तेव्हा त्यांना 'सेवा निधी पॅकेज' (Seva Nidhi Package) अंतर्गत सुमारे 10.04 लाख रुपये (व्याज वगळून) एकत्रित रक्कम दिली जाईल. यामध्ये उमेदवाराचे स्वतःचे योगदान आणि सरकारचे योगदान अशा दोन्ही रकमांचा समावेश असेल. देशसेवेची आवड असलेल्या आणि हवाई दलात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी असून, पात्र उमेदवारांनी मुदतीपूर्वी आपले ऑनलाईन अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी iafrecruitment.edcil.co.in या वेबसाईटला माहिती द्या.
ADVERTISEMENT











