मुंबईची खबर : BEST कर्मचाऱ्यांचा संप, मुंबईकरांचे हाल! काय आहेत मागण्या?

दररोज बेस्ट बसने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना सकाळपासूनच मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. अनेक प्रवासी जेव्हा नेहमीप्रमाणे बस स्टॉपवर पोहोचले, तेव्हा त्यांना या संपाची माहिती मिळाली.

Mumbai News

Mumbai News

विद्या

19 Jun 2026 (अपडेटेड: 19 Jun 2026, 03:29 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईची खबर : BEST कर्मचाऱ्यांचा संप

point

मुंबईकरांचे हाल!

point

काय आहेत मागण्या?

Mumbai News : मुंबईतील 'बेस्ट' (BEST) कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे शुक्रवारी (19 जून) शहराची बस सेवा पूर्णपणे कोलमडली. यामुळे दररोज बसने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना सकाळपासूनच मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. अनेक प्रवासी जेव्हा नेहमीप्रमाणे बस स्टॉपवर पोहोचले, तेव्हा त्यांना या संपाची माहिती मिळाली. अचानक बस सेवा बंद झाल्यामुळे नागरिकांना कामावर जाण्यासाठी नाईलाजाने ऑटो, टॅक्सी आणि इतर खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागला.

हे वाचलं का?

प्रवाशांची प्रचंड गर्दी

या संपाचा सर्वाधिक फटका नोकरदार वर्ग आणि शाळकरी मुलांना बसला. कुर्ला आणि अंधेरी येथील रेल्वे स्थानकांबाहेर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. प्रवाशांनी संताप व्यक्त करत सांगितले की, प्रशासनाने संपाची कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती आणि बस डेपोमध्ये कुठेही सूचना फलक लावले नव्हते. अंधेरीतील एमआयडीसी (MIDC) आणि SEZ भागात जाणाऱ्या प्रवाशांना रिक्षा मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली, तर अनेकांना मोबाईल ॲपवरून बाईक टॅक्सी बुक करण्यासाठीही ताटकळत राहावे लागले.

दरम्यान, अंधेरी येथे आलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या एका बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडाली; बस खच्चून भरल्यामुळे तिचा स्वयंचलित (ऑटोमॅटिक) दरवाजा बंद होत नव्हता. चालकाने बस पुढे नेण्यास नकार दिला आणि वाहकाने पोलिसांना बोलवण्याची तंबी दिली, तेव्हा कुठे प्रवाशांनी थोडे ॲडजस्ट केले आणि कसाबसा दरवाजा बंद होऊन बस पुढे रवाना झाली.

हे ही वाचा : ठाकरेंची साथ सोडल्यानंतर संजय जाधवांची पहिली पोस्ट, फेसबुकचं कमेंट सेक्शन बंद

काय आहेत मुख्य मागण्या?

बेस्ट कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारण्यामागे प्रामुख्याने वेतनवाढ, पेन्शन आणि इतर प्रलंबित मागण्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये 'बेस्ट'चे बजेट मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) मुख्य बजेटशी जोडणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची कायदेशीर थकबाकी एकाच वेळी पूर्ण देणे, 2016 ते 2026 या कालावधीसाठी सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करणे आणि परिवहन व विद्युत विभागातील कंत्राटी (कॉन्ट्रॅक्ट) पद्धत पूर्णपणे बंद करणे यांचा समावेश आहे. या आंदोलनाचे नेतृत्व 'बेस्ट संयुक्त कामगार कृती समिती' करत असून, यामध्ये एकूण 12 कामगार संघटना एकत्र आल्या आहेत.

हे ही वाचा : ‘किमान आदित्य ठाकरेंनी तरी...’, फुटलेले ओमराजे निंबाळकर काय म्हणाले?

मुंबईकरांचे हाल

लोकल ट्रेननंतर 'बेस्ट' ही मुंबईची दुसरी सर्वात मोठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मानली जाते, ज्यातून दररोज सुमारे 25 लाख प्रवासी प्रवास करतात. ऐन गर्दीच्या वेळी ही सेवा बंद पडल्याने संपूर्ण मुंबईकरांचे अतोनात हाल झाले आहेत. या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कडक इशारा दिला आहे की, सार्वजनिक वाहतुकीत अडथळा आणणाऱ्या किंवा 'बेस्ट'च्या सरकारी मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.