Monsoon Update: मान्सून रेकॉर्ड ब्रेक करणार? पावसासाठी 'ही' नवी तारीख पण...

मुंबई तक

• 09:12 PM • 18 Jun 2026

Monsoon Update 2026: राज्याच्या अनेक भागांत मान्सून खोळंबल्यामुळे उष्णतेचा पारा वाढला असताना, आता भारतीय हवामान खात्याने (IMD) मान्सूनच्या प्रवासाबाबत अत्यंत महत्त्वाची नवी तारीख जाहीर केली आहे! 6 जून रोजी कोकणात दाखल झालेला पाऊस तिथेच रखडला आहे, पण आता हा ब्रेक संपणार आहे.

monsoon update 2026 maharashtra new date set will a record be broken rain imd weather forecast june 18 weather

प्रातिनिधिक फोटो

Google CTA

Maharashtra Weather Update: मुंबई: मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना यंदा मान्सून स्वतःचाच उशिराचा रेकॉर्ड मोडणार का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण आत्तापर्यंत मुंबईत मान्सून सर्वाधिक उशिरा जूनच्या उत्तरार्धात दाखल झाल्याची नोंद आहे. मात्र 18 जून उलटूनही मान्सून अद्याप कोकणातच स्थिरावलेला असून पुढे सरकण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली नाही.

हे वाचलं का?

हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार 24 जूननंतर परिस्थितीत काहीसा बदल होण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर पावसाची तीव्रता वाढू शकते आणि त्यानंतर मान्सूनची पुढील वाटचाल सुरू होऊ शकते. मात्र मुंबईत मान्सून नेमका कधी दाखल होईल, याबाबत अद्याप स्पष्ट संकेत मिळालेले नाहीत.

सॅटेलाईट चित्रांमधून काय दिसतंय?

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सॅटेलाईट चित्रे मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या चित्रांमध्ये महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर किंवा मुंबई परिसरात मोठे ढगांचे पट्टे किंवा सक्रिय हवामान प्रणाली दिसत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेकांमध्ये पाऊस लांबणीवर पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.

हे ही वाचा>> मुंबईची खबर : मुंबईवर पाणीसंकट! बीएमसीचा मोठा निर्णय

मात्र हवामान तज्ज्ञांच्या मते, एखादे कमी दाबाचे क्षेत्र किंवा चक्रीवादळासारखी प्रणाली दिसत नसली तरी मान्सूनचे वारे पूर्णपणे थांबलेले नाहीत. त्यांची तीव्रता कमी झाल्याने पावसाचा जोर घटला असून मान्सूनची प्रगती मंदावली आहे.

दक्षिण भारत आणि ईशान्य भारतात ढगांची मोठी हालचाल आणि पाऊस दिसत असताना महाराष्ट्राच्या बहुतांश भागात अशी कोणतीही सक्रिय प्रणाली सध्या आढळत नाही.

18 ते 25 जून : पावसासाठी प्रतिकूल आठवडा

हवामान मॉडेल्सनुसार 18 ते 25 जूनदरम्यान महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. या कालावधीतील नकाशांमध्ये राज्याच्या बहुतांश भागात पांढरा आणि फिकट हिरवा रंग दिसत असून तो कमी पावसाचा संकेत मानला जातो.

हे ही वाचा>> मुंबईची खबर : 20 वर्षात असं कधीच घडलं नव्हतं, मान्सून रखडल्याने मुंबईकरांसमोर मोठं संकट

विशेषतः कोकणातही अपेक्षित सरासरीपेक्षा कमी पाऊस नोंदवला गेला आहे. त्यामुळे मान्सूनची वाटचाल ठप्प झाल्याचे चित्र आहे.

25 जून ते 2 जुलै : पावसाचा जोर वाढण्याचे संकेत

25 जून ते 2 जुलै या कालावधीसाठीचे मॉडेल्स मात्र काहीसा दिलासा देणारे आहेत. या काळात कोकण किनारपट्टीवर गडद हिरवा रंग दिसत असून याचा अर्थ पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

अरबी समुद्रात अनुकूल हवामान प्रणाली तयार झाल्यास कोकणासह पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पावसाला सुरुवात होऊ शकते. मात्र, हा पाऊस पडला तरी तो दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता हवामान मॉडेल्स दर्शवत आहेत.

24 जूननंतर मान्सूनला गती मिळणार?

हवामान अभ्यासक के. एस. होसाळीकर यांनी प्रसिद्ध केलेल्या अंदाजानुसार 24 जूनपासून पश्चिम किनारपट्टीवर पावसाची सक्रियता वाढू शकते. 24 ते 27 जूनदरम्यान कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मात्र, या काळातही मुंबईत मान्सून अधिकृतपणे दाखल होईल की नाही, याबाबत अद्याप अनिश्चितता कायम आहे. त्यामुळे मुंबईत सर्वाधिक उशिरा दाखल झालेल्या मान्सूनचा विक्रम यंदा मोडला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुंबईच्या पाणी साठ्यावर ताण

मान्सून उशिरा येत असल्याने मुंबईच्या जलसाठ्यावर दबाव वाढू लागला आहे. उपलब्ध माहितीनुसार मुंबईला पुरेल इतकाच सुमारे 45 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक आहे.

यामुळे प्रशासनाने काही ठिकाणी पाणी वापरावर निर्बंध घालण्यास सुरुवात केली आहे. स्विमिंग पूल, बांधकाम प्रकल्प आणि इतर काही ठिकाणी पाणी वापर मर्यादित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनीही पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुढील दोन दिवसांसाठी उष्णतेचा इशारा

मुंबई, ठाणे, पालघर, संभाजीनगर, बीड, जळगाव, धुळे, नंदुरबार, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया यांसह अनेक जिल्ह्यांना उष्णतेसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, हिंगोली, परभणी आदी जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हा पाऊस मान्सूनचा नसून प्री-मॉन्सून किंवा अवकाळी स्वरूपाचा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही काळ दिलासा मिळाला तरी उष्णता पुन्हा वाढू शकते.

यंदा मुंबईतील मान्सूनचे आगमन ऐतिहासिकदृष्ट्या सर्वाधिक उशिरा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या मान्सून कोकणातच अडकून पडला असला तरी 24 जूननंतर पश्चिम किनारपट्टीवर पावसाची सक्रियता वाढण्याचे संकेत आहेत. त्यामुळे जूनच्या शेवटच्या आठवड्यात कोकण आणि त्यानंतर मुंबईत पावसाचे आगमन होण्याची आशा कायम आहे. मात्र तोपर्यंत मुंबईकरांना उष्णता, पाणीटंचाईची चिंता आणि मान्सूनच्या प्रतीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.