Mumbai News : मुंबईतील हरित संपदा वाढवण्यासाठी आणि शहराचे पर्यावरण अधिक समृद्ध व्हावे यासाठी बीएमसीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. येत्या काही दिवसांत किमान 1 लाख झाडांची लागवड करण्याचे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात 16 जून रोजी एक विशेष बैठक पार पडली. या बैठकीत महापौरांनी मुंबईतील वृक्ष लागवड मोहिमेला गती देण्याच्या दृष्टीने प्रशासनाला विविध महत्त्वपूर्ण सूचना आणि निर्देश दिले.
ADVERTISEMENT
1 लाख झाडे लावण्याचा निर्णय
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मुंबईत या वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ करण्यात आला होता. आता या उपक्रमाला अधिक वेग देण्यासाठी आणि विविध नाविन्यपूर्ण संकल्पना राबवून 1 लाख झाडे लावण्याचा दृढ निश्चय प्रशासनाने केला आहे. महापौर या नात्याने मुंबईतील हरित क्षेत्र वाढवण्यावर आपला विशेष भर असल्याचे रितू तावडे यांनी या वेळी स्पष्ट केले. मुंबईचे पर्यावरण सुधारण्यासाठी हे अभियान अत्यंत प्रभावी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हे ही वाचा : खासदारांच्या फुटीनंतर आमदारांबाबत रामदास कदम यांचा मोठा दावा
महापौरांच्या सूचना
या संकल्पाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी मुंबईतील पडीक मोकळ्या जागा, रस्त्यांच्या दुतर्फा, रस्ते दुभाजक, वाहतूक बेटे आणि उड्डाणपुलांखालील जागा अशा विविध पर्यायांचा शोध घेण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या आहेत. ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल, तिथे तातडीने वृक्ष लागवड करून हिरवळ फुलवण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. विशेषतः मुंबईचे सौंदर्य खुलवणारे आणि त्याच वेळी शहरातील धूळ व प्रदूषण नियंत्रणास मदत होईल, अशा प्रकारच्या वनस्पतींची निवड करून हरितक्षेत्र विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.
हे ही वाचा : बंडखोरांना इंगा दाखवण्यासाठी ठाकरेंचं पहिलं पाऊल, दिल्लीत मोठ्या घडामोडी
प्रकल्प प्रत्यक्षात तडीस जाणार का?
हा महत्त्वाकांक्षी संकल्प केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात तडीस नेण्यासाठी पालिका प्रशासनाकडून सातत्याने आढावा घेण्यात येईल, असेही महापौर तावडे यांनी सांगितले. मुंबईला प्रदूषणमुक्त आणि सुंदर बनवण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, अशी अपेक्षा या बैठकीत व्यक्त करण्यात आली. या मोहिमेमुळे आगामी काळात मुंबईचा चेहरामोहरा बदलून नागरिकांना स्वच्छ आणि सुंदर पर्यावरण मिळण्यास मोठी मदत होणार आहे.
ADVERTISEMENT











