पालघर : मासिक पाळीनंतर रक्तस्त्राव थांबेना, 55 वर्षीय बाबाने 13 वर्षीय मुलीला स्मशानभूमीत बोलावलं, अन्,...

Palghar Crime : पालघरमध्ये मोठ्या बहिणीचा आजार बरा करण्यासाठी अघोरी पूजेच्या बहाण्याने एका 55 वर्षीय भोंदू बाबाने 13 वर्षीय मुलीवर स्मशानभूमीजवळ अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Palghar Crime

Palghar Crime

मुंबई तक

05 May 2026 (अपडेटेड: 05 May 2026, 11:43 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पालघर : मासिक पाळीनंतर रक्तस्त्राव थांबेना

point

55 वर्षीय बाबाने 13 वर्षीय मुलीला स्मशानभूमीत बोलावलं, अन्,...

Palghar Crimeमो.हुसेन खान : पालघर जिल्ह्यासह संपूर्ण राज्याला हादरवून सोडणारी एक अत्यंत संतापजनक घटना कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. एका अघोरी पूजा करणाऱ्या भोंदू व्यक्तीने केवळ 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. राज्यात महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच, पालघरमध्ये घडलेल्या या प्रकाराने अंधश्रद्धेचा भयानक चेहरा पुन्हा एकदा समाजासमोर आणला आहे. या पीडित चिमुकलीच्या असहायतेचा फायदा घेऊन तिला रात्रीच्या वेळी निर्जन ठिकाणी नेऊन भोंदू बाबाने हे नीच कृत्य केले असून, या घटनेची माहिती मिळताच पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी प्रकरणाची तातडीने दखल घेऊन कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

हे वाचलं का?

मोठ्या बहिणीचा आजार आणि अघोरी पूजेचा बनाव

या घटनेमागील पार्श्वभूमी अत्यंत क्लेशदायक असून, पीडित मुलीच्या मोठ्या बहिणीला मासिक पाळीदरम्यान होणारा रक्तस्त्राव थांबत नसल्याने तिचे कुटुंब चिंतेत होते. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत 55 वर्षीय भोंदू आरोपीने अघोरी पूजेच्या माध्यमातून हा आजार बरा करण्यासाठी औषध देण्याचे आमिष दाखवले. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पूजेचा बहाणा करून त्याने या 13 वर्षीय मुलीला स्मशानभूमीजवळ नेले आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. श्रद्धेच्या नावाखाली चालणाऱ्या अशा अघोरी प्रकारांमुळे एका निरागस मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न या भोंदू आरोपीने केल्याने लोकांमधून संताप व्यक्त केला जातोय. 

कासा पोलिसांची तत्परता; दोन तासांत आरोपीला बेड्या

घटनेची माहिती मिळताच कासा पोलिसांनी तपासाची चक्रे अत्यंत वेगाने फिरवली आणि गुन्हा घडल्यानंतर अवघ्या दोन तासांच्या आत 55 वर्षीय आरोपीला त्याच्या मुसक्या आवळून ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेसह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा अर्थात पोक्सो (POCSO) अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. या घटनेमुळे पोलीस प्रशासनाने अशा भोंदूगिरी करणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहण्याचे आवाहन केले असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असा इशाराही दिला आहे.

 पीडितेवर रुग्णालयात उपचार; प्रकरणाचा सखोल तपास सुरू

सध्या या पीडित चिमुकलीवर कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  समाजामध्ये पसरलेली अंधश्रद्धा आणि अघोरी पूजेवर असलेला विश्वास एका निरागस मुलीसाठी कसा जीवघेणा ठरू शकतो, याचे हे विदारक उदाहरण पालघरमध्ये पाहायला मिळाले आहे. कासा पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून या गुन्ह्यात आरोपीला आणखी कोणी मदत केली आहे का, या दिशेनेही चौकशी केली जात आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

बीड : पत्नी नांदायला येत नसल्याने पती संतापला; पोटच्या दोन लेकरांना डिझेल टाकून जाळण्याचा प्रयत्न