अकोला : आई-वडील मजूरीला गेले अन् घडलं भयानक, 60 वर्षीय शेजाऱ्याने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार
अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका गावात 60 वर्षीय वृद्धाने आपल्या शेजारी राहणाऱ्या 10 वर्षांच्या निष्पाप मुलीवर अत्याचार केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अकोला : आई-वडील मजूरीला गेले अन् घडलं भयानक
60 वर्षीय शेजाऱ्याने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार
Akola Crime, धनंजय साबळे : महाराष्ट्रात महिला आणि मुलींविरोधातील वाढत्या गुन्ह्यांनी पुन्हा एकदा माणुसकीला काळिमा फासला आहे. राज्य अद्याप बदलापूर आणि नसरापूरच्या घटनांमधून सावरलेले नसतानाच, अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील चान्नी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात 60 वर्षीय वृद्धाने आपल्या शेजारी राहणाऱ्या 10 वर्षांच्या निष्पाप मुलीवर अत्याचार केला.
आई-वडिलांच्या अनुपस्थितीचा घेतला फायदा
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे आई-वडील शेतमजूर असून ते नेहमीप्रमाणे कामासाठी शेतात गेले होते. याच संधीचा फायदा घेत शेजारी राहणाऱ्या आरोपी वृद्धाने गेल्या 4-5 दिवसांपासून मुलीला धमकावून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. निष्पाप मुलगी भीतीपोटी शांत होती, मात्र जेव्हा अत्याचाराची हद्द पार झाली, तेव्हा तिने धीर एकवटून आपल्या आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. काल (5 मे) संध्याकाळी नातेवाईकांनी तातडीने चान्नी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली.
हे ही वाचा : एक कुटुंब, तीन आमदार, तीन पक्ष..'या' कुटुंबाला लागला जॅकपॉट
पोलिसांची तीन पथके तैनात
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र, पोलीस पोहोचण्यापूर्वीच आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला. याप्रकरणी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी सांगितले की, "आरोपी आणि पीडित कुटुंब शेजारी होते आणि त्यांच्यात चांगले संबंध होते, असे असूनही आरोपीने इतके घृणास्पद कृत्य केले. आम्ही चान्नी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची तीन ते चार पथके रवाना केली आहेत. तो जवळच्या जंगलाच्या दिशेने पळाल्याची माहिती मिळाली असून, आम्ही त्याला लवकरच अटक करू. सध्या परिसरात परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी शांतता राखली आहे."
हे ही वाचा : पुणे : सुट्टीला आलेल्या नातीवर आजोबाचा अत्याचाराचा प्रयत्न, संतप्त जमावाने दिला चोप
परिसरात संतापाची लाट
या घटनेनंतर पातुर तालुक्यात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिक रहिवाशांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले असून आरोपीला शोधून काढण्याचे आश्वासन दिले आहे.









