Nagpur Crime : साताऱ्यात महिला डॉक्टरने पोलीस अधिकाऱ्यांच्या लैंगिक छळाला कंटाळून आत्महत्या केली. हे प्रकरण अजूनही शांत झालेले नाही. या प्रकरणात यामध्ये आणखी मोठे खुलास होत आहेत. दरम्यान, हे प्रकरण तापलेले असताना नागपुरातून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूर शहरातील एका पोलीस कर्मचाऱ्यावर 23 वर्षीय तरुणीचा लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे पोलीस दलावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, उमेश शेळके असे या आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. कपिल नगर पोलीस ठाण्यात तीन आठवड्यांपूर्वी पीडित तरुणीने या संदर्भात तक्रार दाखल केली होती. तक्रारीत तिने म्हटलं आहे की, उमेश शेळके याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिचा वारंवार लैंगिक छळ केला. सुरुवातीला तो प्रेमसंबंधात असल्याचं भासवत होता, मात्र नंतर त्याने फसवणूक केली आणि शारीरिक व मानसिक छळ सुरु केला.
हेही वाचा : शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची देवेंद्र फडणवीसांनी चौकशी लावली, नेमकं प्रकरण काय?
पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी अद्यापही आरोपीविरोधात ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप पीडितेने केला आहे. ती म्हणाली की, “गुन्हा दाखल होऊन तीन आठवडे झाले, पण आरोपी अजूनही मोकाट फिरतोय. पोलिसांकडून फक्त ‘तो फरार आहे, शोध सुरू आहे’ एवढंच उत्तर दिलं जातं.”
यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत. एका बाजूला राज्यभर पोलीस दलावर शिस्तभंग आणि महिला अत्याचार प्रकरणांबद्दल चर्चा सुरू असताना, नागपुरातील या घटनेने परिस्थिती अधिक चिंताजनक केली आहे. या प्रकारामुळे पुन्हा एकदा “रक्षकच जेव्हा भक्षक बनतात” या वाक्याचा अर्थ लोकांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळत आहे. समाजात महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून उदाहरण घालून देण्याची अपेक्षा असते, मात्र अशा घटना पोलिसांच्या प्रतिमेला मोठा धक्का देतात. नागपुरातील या प्रकरणामुळे राज्यातील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











