Nalasopara News : नालासोपारा परिसराला हादरवून टाकणारी घटना सोमवारी सकाळी समोर आली. चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मेहराज शेख (वय 8) या चिमुकल्याचा मृतदेह एका बांधकामाधीन इमारतीतील पाण्याच्या टाकीत आढळला. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, तो मित्रांसोबत लपाछपी खेळताना चुकून टाकीत कोसळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT
3 डिसेंबर रोजी बेपत्ता झाला मेहराज
नालासोपारा पश्चिमेतील टाकीपाडा परिसरातील कारारीबाद येथील चाळीत मेहराज कुटुंबासोबत राहत होता. ३ डिसेंबरच्या दुपारी तो खेळण्यासाठी घराबाहेर पडला होता. नेहमीप्रमाणे काही वेळात तो घरी परत येईल, अशी अपेक्षा कुटुंबाला होती. मात्र अनेक तास उलटून गेल्यानंतरही मेहराज परतला नाही, त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली.
सातत्याने शोध, पण निष्फळ
कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी परिसरात रात्रभर शोध घेतला, पण मुलाचा काहीच ठावठिकाणा लागला नाही. अखेर 4 डिसेंबर रोजी मेहराजची आई नालासोपारा पोलिस ठाण्यात धाव घेऊन मुलगा हरवल्याची तक्रार नोंदवली. चौकशीसाठी गुन्हा दाखल करून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली होती.
सोमवारी सकाळी टाकीत तरंगताना मृतदेह
तपास सुरू असताना सोमवारी सकाळच्या सुमारास स्थानिकांनी एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतील पाण्याच्या मोठ्या टाकीत एक मृतदेह दिसल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत टाकी रिकामी करून मृतदेह बाहेर काढला. मुलाचे कपडे आणि शरीरावरील खुणांवरून तो मृतदेह मेहराजचाच असल्याचे स्पष्ट झाले.
लपाछपी खेळताना पडल्याची शक्यता
चौकशीदरम्यान मेहराजसोबत खेळणाऱ्या काही मुलांनी पोलिसांना सांगितले की ते लपाछपी खेळत होते. खेळाच्या वेळी मेहराज पाण्याच्या टाकीजवळ गेला आणि तोल जाऊन खाली पडला असावा. टाकी उघडी असल्याने कोणाच्याही नजरेत न येता तो पाण्यात बुडाला, अशी माहिती मित्रांनी दिल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विशाल वळवी यांनी सांगितले.
पोलिसांकडून पुढील तपास सुरू
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बांधकामस्थळी सुरक्षेच्या उपाययोजना नसल्यानंही स्थानिकांमध्ये नाराजी आहे. पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आलाय. मेहराजच्या आकस्मिक मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली असून, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











