Nashik Crime , नाशिक : शेतजमिनीच्या खरेदी खतावर झालेली फेरफार नोंद रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या तक्रारीचा निर्णय तक्रारदाराच्या बाजूने देऊन ती नोंद मंजूर करण्यासाठी सिन्नरच्या नायब तहसीलदारांनी दहा लाखांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आलाय. शिवाय, सिन्नरच्या नायब तहसीलदार संजय भिकाजी धनगर (वय 51) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागा अडीच लाखांची लाच स्विकारताना रंगेहात पकडत अटक केली आहे.
ADVERTISEMENT
नायब तहसीलदाराने कशासाठी लाच मागितली होती?
तक्रारदाराने सिन्नर तालुक्यातील दोडी खुर्द येथील गट क्रमांक 499 मधील 3 हेक्टर 60 आर क्षेत्राची जमीन विकत घेतली होती. या खरेदी खतावरून फेरफार नोंद क्रमांक 3345 रद्द करण्यासाठी त्याने अर्ज केला होता. तक्रारीनुसार, हा निकाल तक्रारदाराच्या मुलगा आणि सुनेस अनुकूल लागावा, तसेच फेरफार नोंदीस मंजुरी मिळावी, यासाठी धनगर यांनी 6 डिसेंबर रोजी दहा लाख रुपये मागितले होते, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोंदवलेल्या फिर्यादीत नमूद आहे.
हेही वाचा : बीड : सातबारा दुरुस्तीसाठी तहसीलदारांची बनावट सही केली, नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर गुन्हा दाखल
अँटी करप्शन ब्युरोने सापळा रचला
लाच मागितल्याची माहिती मिळताच तक्रारदाराने अँटी करप्शन ब्युरोकडे संपर्क साधला. पोलिस अधीक्षक भारत तांगडे, अपर अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दारंग यांच्या सूचनेनुसार कारवाई करण्याचे ठरवण्यात आले. पोलिस निरीक्षक रूपाली खांडवी यांच्या पथकाने 9 डिसेंबर रोजी सापळा रचला.
मुंबई नाका परिसरातील कुटे मार्गावर तक्रारदाराकडून अडीच लाख रुपयांची रोकड स्वीकारताच धनगर यांना पंचांसमक्ष रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी त्यांच्या विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांनी लाच मागण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये लाच घेण्याचं प्रमाण वाढल्याचं चित्र आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











