नाशिक : माजी जिल्हा परिषद सदस्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत नाल्यात सापडला, सर्वत्र खळबळ

Nashik Crime : कैलास चौधरी हे राहत्या घरातून अचानक निघून गेल्यानंतर त्यांचा कुठलाही पत्ता लागत नव्हता. कुटुंबीयांनी नातेवाईक, परिचित तसेच विविध ठिकाणी त्यांचा शोध घेतला. मात्र, अनेक दिवस उलटूनही चौधरी यांचा ठावठिकाणा लागला नाही.

Nashik Crime

Nashik Crime

मुंबई तक

19 Dec 2025 (अपडेटेड: 19 Dec 2025, 11:23 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

नाशिक : माजी जिल्हा परिषद सदस्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत नाल्यात सापडला

point

जिल्हा परिषदचे माजी सदस्य कैलास किसन चौधरी गेल्या काही दिवसांपासून होते बेपत्ता

नाशिक : जिल्हा परिषदचे माजी सदस्य कैलास किसन चौधरी यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत नाल्यात आढळून आल्याने नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. गेल्या आठवडाभरापासून बेपत्ता असलेले चौधरी यांचे पार्थिव गुरुवारी (दि. 18) दुपारी पळसे पंपिंग रोडवरील पळसे राजवाडा नाल्याच्या पुलाखाली पाण्यात तरंगताना दिसून आले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि संशयाचे वातावरण पसरले आहे.

हे वाचलं का?

कैलास चौधरी हे राहत्या घरातून अचानक निघून गेल्यानंतर त्यांचा कुठलाही पत्ता लागत नव्हता. कुटुंबीयांनी नातेवाईक, परिचित तसेच विविध ठिकाणी त्यांचा शोध घेतला. मात्र, अनेक दिवस उलटूनही चौधरी यांचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर कुटुंबीयांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी बेपत्ता व्यक्ती म्हणून नोंद घेत तपास सुरू केला होता.

दरम्यान, गुरुवारी दुपारी पळसे पंपिंग रोड परिसरात असलेल्या नाल्याच्या पुलाखाली पाण्यात एक मृतदेह तरंगताना दिसल्याची माहिती स्थानिकांना मिळाली. काही नागरिकांनी जवळ जाऊन पाहिल्यानंतर मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. ही बाब लक्षात येताच परिसरात मोठी गर्दी झाली. घटनेची माहिती तात्काळ पोलिसपाटील सुनील गायधनी यांना देण्यात आली. त्यांनी विलंब न करता नाशिकरोड पोलिसांना कळवले.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. तपासादरम्यान तो मृतदेह बेपत्ता असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास किसन चौधरी यांचाच असल्याची ओळख पटली. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या घटनेने चौधरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, मुलगा, मुलगी, भावजयी आणि पुतणे असा मोठा परिवार आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात परिचित असलेल्या व्यक्तीचा अशा अवस्थेत मृत्यू झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. हा अपघात आहे की घातपात, याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.

सध्या नाशिकरोड पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, चौधरी यांच्या बेपत्ता होण्यापासून ते मृतदेह सापडेपर्यंतच्या घटनाक्रमाचा मागोवा घेतला जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स आणि त्यांच्या शेवटच्या हालचालींची माहिती तपासात घेतली जात आहे. शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कारवाई आणि तपासाची दिशा निश्चित होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

'माझा मुलगा 12 वर्षांपासून कोमात, त्याला मरण द्या', पालकांची न्यायालयात मागणी; आता न्यायमूर्ती प्रत्यक्ष जाणार अन्...

    follow whatsapp